नागपूर : शहरातील अमरस्वरुप फाऊंडेशन व पुलक मंच परिवार या संस्थांशी जुळलेले समाजसेवी गरजू व्यक्तींसाठी गेल्या चार महिन्यापासून ''कबाड से जुगाड'' करीत आहेत. या उपक्रमांतर्गत गरजूंना लॅपटॉप, कॉम्प्युटर, स्मार्टफोन, पुस्तके, कपडे, फर्निचर इत्यादी वस्तू पुरवल्या जात आहेत. आतापर्यंत शेकडो गरजूंना उपक्रमाचा लाभ मिळाला आहे.
‘कबाड से जुगाड’ हा उपक्रम नावाप्रमाणेच ‘कबाड’पासून ‘जुगाड’ करणारा आहे. कालबाह्य झालेल्या, उपयोग संपलेल्या आणि थोडा बिघाड झाल्यामुळे टाकून दिल्या अशा, अनेक वस्तू घरामध्ये वर्षानुवर्षे पडल्या असतात. घरच्यांकरिता त्या वस्तू ''कबाड'' असतात आणि बरेचदा त्या वस्तू ''कबाड'' म्हणूनच मिळेल त्या किमतीत विकल्या जातात. त्या वस्तू गरजू व्यक्तींच्या उपयोगात येऊ शकतात याचा फार कमी विचार केला जातो. या सत्याची जाणिव झाल्यामुळे अमरस्वरुप फाऊंडेशनचे भूविष मेहता व पुलक मंच परिवारचे मनोज बंड यांनी कबाड से जुगाड उपक्रमाची आखणी केली. या उपक्रमामध्ये नागरिकांकडून त्यांच्या घरी विविध कारणांमुळे निरुपयोगी पडलेले लॅपटॉप, कॉम्प्युटर, स्मार्टफोन, पुस्तके, कपडे, फर्निचर इत्यादी वस्तू गोळा केल्या जातात. त्यानंतर आवश्यक दुरुस्ती करून त्या वस्तू वापरण्यायोग्य केल्या जातात आणि गरजू व्यक्तींना वाटप केल्या जातात. या उपक्रमाने आतापर्यंत शेकडो गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शरद मचाले, रमेश उदेपूरकर, निर्मल शाह, राहुल मोहुर्ले, रवींद्र भुसारी, जय मेहता, सर्वेश किनारिवाला, प्रतीक जुनेजा आदी कार्यकर्ते कार्य करीत आहेत. मनीष मेहता यांनी वस्तू गोळा करणे व साठविण्यासाठी वाहने व जागा उपलब्ध करून दिली आहे. हा उपक्रम समाजाकरिता प्रेरणादायी ठरला आहे.