त्यांना मिळाले हक्काचे घर!

By admin | Published: January 5, 2015 12:51 AM2015-01-05T00:51:09+5:302015-01-05T00:51:09+5:30

माणसांप्रमाणे प्राण्यांनाही सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार आहे, अशी भावना बाळगून कार्य करणाऱ्या संस्थांच्या वतीने रविवारी महाराजबाग येथे गावठी कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक देण्याचा

They got their home! | त्यांना मिळाले हक्काचे घर!

त्यांना मिळाले हक्काचे घर!

Next

२८ गावठी पिल्ले दत्तक : पीपल फॉर अ‍ॅनिमल संस्थेचा उपक्रम
नागपूर : माणसांप्रमाणे प्राण्यांनाही सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार आहे, अशी भावना बाळगून कार्य करणाऱ्या संस्थांच्या वतीने रविवारी महाराजबाग येथे गावठी कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यातून २८ पिल्लांना हक्काचे घर मिळाले. पीपल फॉर अ‍ॅनिमल, दि लॉयल्स व इनरव्हील क्लब पूर्व नागपूर या तीन संस्थांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबविला.
काळजी घेणारा कोणीच राहात नसल्यामुळे बेवारस गावठी कुत्र्यांना अत्यंत हलाखीत जगावे लागते. त्यांना पोटभर खायला मिळत नाही. कोणाच्या घरी गेल्यास अत्यंत निर्दयीपणे हाकलून लावले जाते. जिकडे जावे तिकडे उपेक्षा सहन करावी लागते. वाहनचालक कुत्र्यांच्या जीवाला काहीच किंमत नसल्यासारखे वागतात. रस्त्यावर आलेल्या कुत्र्यांना धडक मारून निघून जातात. जखमी कुत्र्यांकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यांचा वेदनादायक मृत्यू होतो. सध्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या संस्था व त्याअंतर्गत कार्य कारणारे पशुप्रेमी हेच बेवारस कुत्र्यांचा आधार आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे जनावरांच्या हक्काबाबत समाज हळूहळू जागृत होत आहे. कुत्र्यांच्या दत्तक उपक्रमाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादातून हे सिद्ध होत आहे.
विदेशीपेक्षा गावठी ‘बेस्ट’
आजकाल सर्वत्र विदेशी कुत्री पाळण्याचे चलन आहे. लाखो रुपये खर्च करून विदेशी कुत्री खरेदी केली जातात. यानंतर त्यांच्या पालनपोषणावरही पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. या कुत्र्यांना भारतातील वातावरण भावत नाही. त्यांना वातानुकूलित खोलीत ठेवावे लागते. सकस आहार द्यावा लागतो. एवढे करूनही विदेशी कुत्र्यांचे आयुष्यमान फार कमी आहे. गावठी कुत्री मोठ्या संख्येत उपलब्ध असताना व खरेदी करावी लागत नसतानाही त्यांना पाळले जात नाही. ग्रामीणपेक्षा शहरी भागात गावठी कुत्री पाळण्याचे प्रमाण फारच कमी आहे. गावठी कुत्रीही दिसायला गोंडस व आक्रमक असतात. त्यांना पाळण्यासाठी फार खर्च करावा लागत नाही. त्यांना स्थानिक वातावरणाची सवय झालेली असते. त्यांचे आयुष्यमान विदेशी कुत्र्यांपेक्षा जास्त असते. गावठी कुत्री पाळल्यास बेवारस कुत्र्यांची समस्या आपोआप सुटेल, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.
किटू गिडवानींच्या हस्ते दत्तक
प्राण्यांच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या टीव्ही मालिका व चित्रपट अभिनेत्री किटू गिडवानी यांच्या हस्ते गावठी कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक देण्यात आले. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना प्राण्यांनाही चांगले जीवन जगण्याचा हक्क असल्याचे सांगितले. माणसाप्रमाणे प्राण्यांनाही देवानेच जन्माला घातले आहे. या पृथ्वीवर जगण्याचा आपला जेवढा अधिकार आहे, तेवढाच प्राण्यांचाही आहे. एक बुद्धिजीवी म्हणून प्राण्यांचे संरक्षण करणे, त्यांना खायला देणे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे माणसाची जबाबदारी आहे. विशेषत: तरुणांनी या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले पाहिजे, असे मत गिडवानी यांनी व्यक्त केले.
दरवर्षी राबविला जातो उपक्रम
गावठी कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक देण्याचा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे, अशी माहिती पीपल फॉर अ‍ॅनिमलच्या नागपूर शाखा सचिव करिष्मा गलानी यांनी दिली. महानगरपालिकेतर्फे भांडेवाडी येथे बेवारस जनावरांसाठी निवासालय सुरू करण्यात आले आहे. निवासालयाचे संचालन व देखभालीची जबाबदारी पीपल फॉर अ‍ॅनिमल संस्थेवर आहे. येथून दरवर्षी १०० ते १५० गावठी कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक घेतले जाते. येथील जनावरांच्या देखभालीसाठी दर महिन्याला सुमारे ६० हजार रुपये खर्च येतो. यापैकी ७५ टक्के खर्च संस्थेच्या संस्थापक आणि महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी करतात. विनोद घाटे हे रोज १० लिटर दूध नि:शुल्क देतात. (प्रतिनिधी)
जखमी जनावरांच्या माहितीसाठी हेल्पलाईन
पीपल फॉर अ‍ॅनिमल संस्थेतर्फे जखमी जनावरांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. ९९२१५४६८६३ हा हेल्पलाईनचा मोबाईल क्रमांक आहे. या क्रमांकावर शहरात कोठेही जखमी अवस्थेत आढळलेल्या जनावरांची माहिती देता येईल. संस्थेकडे जखमी जनावरांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी वाहन (अ‍ॅम्बुलन्स) आहे. जनावरांच्या संरक्षणासाठी करिष्मा गलानी यांच्यासह आकाश वलेजा, रोहित यादव, पुष्पेंद्र यादव, अंजली वेदयार, आशा दवे, श्रीकांत अंबर्ते, स्वप्नील बोधाने, हनी ठक्कर, कमल कृपलानी, स्मिता राहाटे आदी कार्यरत आहेत.

Web Title: They got their home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.