सुमेध वाघमारे
नागपूर : ओमायक्रॉन या व्हेरिएंटमुळे दक्षिण आफिक्रेत कोरोना संसर्गाची त्सुनामी आली होती; परंतु जेवढ्या प्रचंड वेगाने ही लाट आली तेवढ्याच वेगाने ती ओसरली. त्याच पार्श्वभूमीवर आपल्याकडेही तिसरी लाट झपाट्याने पसरण्याची व तेवढ्याच गतीने कमी होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
‘ओमायक्रॉन’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेतूनच जगभरात पसरला. ‘डेल्टा’पेक्षाही तीन पटीने हा जास्त वेगाने पसरत असल्याने चिंता वाढली आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे १,८९२ बाधित आढळून आले. मागील ८ दिवसांत ५१० रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यात रुग्णसंख्यावाढीला वेग आला आहे. नागपुरातही पाच दिवसांत ६८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असली, तरी ही लाट वेगाने शिखरावर पोहोचून तेवढ्याच वेगाने ओसरेल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- तीनच आठवड्यांत ओसरली लाट
संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे म्हणाले, दक्षिण आफ्रिकेत २४ नोव्हेंबर रोजी ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढली; परंतु तीनच आठवड्यांत म्हणजे, १५ डिसेंबर रोजी ही लाट ओसरली. विशेष म्हणजे, तिथे २५ टक्केच लसीकरण झाले होते. त्यानंतरही गंभीर रुग्णांची संख्या कमी होती. आपल्याकडेही असेच चित्र राहण्याची शक्यता आहे.
- तपासणीचे प्रमाण कमी राहणार
तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे; परंतु बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या तपासणीकडे लक्ष दिले जात आहे. नव्या विषाणूबाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत असल्याने तपासणीचे प्रमाण कमी आहे. चाचण्या कमी तर रुग्णही कमी आढळून येण्याची शक्यता आहे, शिवाय ‘डेल्टा विषाणू’ हा अधिक संसर्गजन्य व थेट फुप्फुसावर परिणाम करणार होता. परंतु ओमायक्रॉनचा संसर्ग हा नाकावाटे पुढे फुप्फुसापर्यंत पोहोचतच नाही. परंतु ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा झपाट्याने पसरतो.
- लाट जितक्या वेगाने वाढते तितक्याच वेगाने कमी होते
कोरोना टास्क फोर्सचे सदस्य व ‘एम्स’च्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. पी. पी. जोशी म्हणाले, लाट जितक्या वेगाने वाढते तितक्याच वेगाने ती कमी होते. ही लाटही अशीच राहण्याची शक्यता आहे. ‘ओमायक्रॉन’ या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य आहेत. शिवाय, आपल्याकडे बऱ्यापैकी लसीकरण झाले आहे. यामुळे गंभीर रुग्णांची संख्या कमी राहील.