नागपूरकरांसाठी यंदाचा एप्रिल दशकातील सर्वांत 'कूल'
By निशांत वानखेडे | Published: April 23, 2024 06:02 PM2024-04-23T18:02:54+5:302024-04-23T18:04:33+5:30
Nagpur : उन्हाचे चटके कमी पाऊसच अधिक पुढचा; आठवडाभरही ढगाळ वातावरणाचा अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपुरात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचे सावट पसरले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या २८ एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. असे झाले तर यंदाचा एप्रिल महिना दशकातील सर्वांत थंड महिना ठरेल, अशी शक्यता आहे.
एप्रिल महिन्याचे जवळपास तीन आठवडे लोटत चालले आहेत. उन्हाळ्याची सुरुवात करणारा हा महिना तापदायक असतो. यंदा 'एल-निनो'चा प्रभाव असल्याने एप्रिल चांगलाच तापेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र एल-निनोला प्रभावहिन करीत पाऊण महिना उन्हाचे चटके कमी व ढगांचीच सरबत्ती अधिक राहिली. २२ दिवसांपैकी केवळ ८ दिवस उन्हाचे चटके बसले व उरलेल्या १४ दिवसात ढगाळ वातावरण व पावसाचा प्रभाव होता. विशेष म्हणजे ११ एप्रिल रोजी कमाल तापमान १४.६ अंशाने खाली घसरले व २५.८ अंशाची नोंद झाली, जी दशकातील सर्वांत कमी आहे. १९ एप्रिल रोजी महिन्यातील सर्वाधिक ४१.४ अंश कमाल तापमानाची नोंद झाली व हीसुद्धा दशकातील सर्वांत कमी आहे. उरलेले ८ दिवस असेच काहीसे वातावरण राहिले तर दशकातील सर्वांत थंड एप्रिल म्हणून यंदाची नोंद होईल, हे निश्चित. दशकापूर्वी २००९ साली ३० एप्रिलला ४७.१ अंश तापमान होते.
दशकातील एप्रिलचे सर्वाधिक तापमान
वर्ष तापमान दिवस
२०१४ ४३.७ २९
२०१५ ४४.५ २९
२०१६ ४५ २२
२०१७ ४५.५ १९
२०१८ ४५. २ ३०
२०१९ ४५. ३ २८
२०२० ४३. ४ १८
२०२१ ४३. १ २९
२०२२ ४५. २ ३०
२०२३ ४२ २०
यावर्षी एप्रिलचे तापमान
■ १ ते ५ एप्रिलपर्यंत तापमान ४० ते ४१ अंशावर. ४ एप्रिल रोजी ४१.३ अंशावर.
■ ७ ते १५ एप्रिलर्यंत ढगांचे सावट. ७ एप्रिल ३२.५ अंशावर, जे
सरासरीच्या ८.१ अंशाने खाली.
• ९ एप्रिल रोजी ३३.६ अंशावर.
■ ११ एप्रिल : २५.८ अंश, सरासरीपेक्षा १४.६ अंशाने खाली.
■ १३ ते १५ एप्रिल दरम्यान पावसाळी वातावरण. पारा ८ ते १० अंशाने खाली.
• १९ एप्रिल रोजी सर्वाधिक ४१.४ अंश.
त्यानंतर ढगाळ वातावरण. २२ रोजी पुन्हा तापमान ३३ अंशावर.