‘ईडी’मार्फत चौकशी सुरू असलेल्यांना पक्षप्रवेश नाही; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 05:41 AM2019-07-29T05:41:44+5:302019-07-29T05:42:12+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि त्यांचे इतर सहकारी यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे
नागपूर : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेते राहायला का तयार नाहीत, यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आत्मचिंतन करावे. पक्षात घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष कुणावरही दबाव टाकत नाही. तसेच कुणा नेत्याच्या मागे धावावे लागेल, अशी भाजपची स्थिती नाही. ईडीमार्फत चौकशी सुरू असलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही. जे नेते चांगले काम करीत आहेत त्यांनाच भाजपमध्ये घेतले जाईल, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे रविवारी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि त्यांचे इतर सहकारी यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे, असा गंभीर आरोप केला होता. पवार यांनी केलेल्या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अडचणीच्या काळात आणि अनेक साखर कारखानदारांना मदत केली आहे. परंतु या मदतीच्या बदल्यात तुम्ही भाजपमध्ये या, असे आम्ही त्यांना कधीही म्हटलेले नाही. पक्ष वाढवण्यासाठी भाजपने कधीही दबावाचे राजकारण केले नाही. आमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा मोठा नेता आहे. लोक पक्ष सोडून बाहेर का जात आहेत, याबाबत शरद पवार यांनीच आत्मचिंतन करायला हवे.