शंभुराजेंच्या यातनांनी प्रेक्षकही थरारतो : हजारो प्रेक्षकांनी डोळ्यात साठविले प्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:33 AM2018-12-28T00:33:44+5:302018-12-28T00:34:39+5:30
घरभेद्यांच्या कपट कारस्थानाचा उपयोग करून औरंगजेब बादशाह शंभुराजेंना पकडतो. पुढे सुटकेसाठी औरंगजेब त्यांच्यासमोर स्वराज्याचे गडकिल्ले देण्याची व धर्मपरिवर्तनाची अट घालत पुढील ४० दिवस प्रचंड यातना देतो. अगदी कानात शिसे ओतण्यापासून डोळे फोडणे व जीभ कापण्यापर्यंतच्या यातना... ज्या वाचतानाही अंगावर काटा उभा होतो. शंभुराजेंवर झालेल्या त्या यातना ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातून प्रत्यक्ष पाहताना प्रत्येक प्रेक्षक थरारून उठतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरभेद्यांच्या कपट कारस्थानाचा उपयोग करून औरंगजेब बादशाह शंभुराजेंना पकडतो. पुढे सुटकेसाठी औरंगजेब त्यांच्यासमोर स्वराज्याचे गडकिल्ले देण्याची व धर्मपरिवर्तनाची अट घालत पुढील ४० दिवस प्रचंड यातना देतो. अगदी कानात शिसे ओतण्यापासून डोळे फोडणे व जीभ कापण्यापर्यंतच्या यातना... ज्या वाचतानाही अंगावर काटा उभा होतो. शंभुराजेंवर झालेल्या त्या यातना ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातून प्रत्यक्ष पाहताना प्रत्येक प्रेक्षक थरारून उठतो.
माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने माजी आमदार मोहन मते यांच्या पुढाकाराने ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य गेल्या २२ डिसेंबरपासून रेशीमबाग मैदानावर सुरू आहे. गुरुवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, जिल्हा न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभा इंगळे, आमदार समीर मेघे, सतीश मुंडे व नगरसेवकांच्या उपस्थिती दीपप्रज्वलन, अश्व व गजपूजन करून महानाट्याला सुरुवात करण्यात आली. प्रचंड यातना सहन करूनही स्वराज्यावर नितांत प्रेम करणारा हा राजा धर्मापासून परावृत्त होत नाही व शेवटी मरणही पत्करतो. महानाट्यातून सादर होणारा हा धगधगता इतिहास प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या महानाट्याबद्दल लोकांमध्ये जेवढी उत्सुकता होती आणि भव्यदिव्य असे हे सादरीकरण लोकांच्या अपेक्षांनाही खरे उतरले. नेपथ्य, मंच आणि सादरीकरणाच्या सर्वच अंगाने भव्य असलेले हे महानाट्य कलावंतांच्या जिवंत अभिनयानेही उत्कृष्ट ठरले आहे. भावनिक करणारा प्रत्येक प्रसंग दर्शकही मनात साठवितात. त्यामुळे पहिल्या दिवशी पाहिल्यानंतर हे महानाट्य प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. गेल्या सहा दिवसांपासून प्रचंड प्रतिसादात सुरू असलेल्या या महानाट्याचे नागपुरातील प्रयोग उद्या संपणार आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी तरी पाहता यावे म्हणून लोकांची चढाओढ सुरू आहे.