नागपुरात झोपडपट्टीधारकांना हजारो रुपयांची डिमांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:06 AM2018-05-24T00:06:09+5:302018-05-24T00:06:20+5:30
महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात ५०० चौरस फूटापर्यंत कोणत्याही स्वरुपाचे शुल्क आकारले जाणार नाही. त्यावरील जागेचे भाडे घेण्यात येईल. अशी घोषणा करण्यात आली होती. शासनाने घोषणा करताचा नगरसेवकांच्या पुढाकाराने पट्टेवाटप कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले. मात्र आता नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)ने वार्षिक भूभाटकाची ५ ते १० लाखांची रक्कम निश्चित केली आहे. १ एप्रिल २०१८ पासून ही रक्क्म भरण्याबाबतच्या डिमांड पाठविण्याला सुरुवात केल्याने झोेपडपट्टीधारकांत प्रचंड खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात ५०० चौरस फूटापर्यंत कोणत्याही स्वरुपाचे शुल्क आकारले जाणार नाही. त्यावरील जागेचे भाडे घेण्यात येईल. अशी घोषणा करण्यात आली होती. शासनाने घोषणा करताचा नगरसेवकांच्या पुढाकाराने पट्टेवाटप कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले. मात्र आता नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)ने वार्षिक भूभाटकाची ५ ते १० लाखांची रक्कम निश्चित केली आहे. १ एप्रिल २०१८ पासून ही रक्क्म भरण्याबाबतच्या डिमांड पाठविण्याला सुरुवात केल्याने झोेपडपट्टीधारकांत प्रचंड खळबळ उडाली आहे.
झोपडपट्टीधारकांना ३० वर्षापर्यत दरवर्षी हजारो रुपये भूभाटक म्हणून नासुप्रकडे जमा करावयाचे आहे. १ जूनपर्यंत ही रक्कम न भरल्यास या रकमेवर १२ टक्के दराने व्याज आकारले जाणार आहे. पूर्व नागपुरातील हिवरी नगर भागातील झोपडपट्टीधारकांना अशा स्वरुपाच्या डिमांड मिळालेल्या आहेत. हिवरी नगर स्लम भागातील मोहम्मद हादीस सफिद अन्सारी यांचा ४४.८६ चौ. मीटरचा भूखंड आहे. त्यांची जागा ५०० चौरस फुटापेक्षा कमी आहे. त्यांना वार्षिक भूभाटकाकरिता एकूण प्रव्याजी ४ लाख ४८ हजार ५८९ रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यावर वार्षिक २ टक्के दराने प्रव्याजी रक्कम म्हणून दरवर्षी ८ हजार ९७२ रुपये ३० वर्षापर्यंत भरावयाचे आहे. अशा स्वरुपाच्या डिमांड अन्य झोपडपट्टीधारकांनाही मिळालेल्या आहेत. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्वच नोटीफाईड, नॉननोटीफाईड झोपडपट्टीधारकांना या डिमांड पाठविण्यात येणार आहे.
पूर्व नागपुरातील पँथरनगर, पडोळे नगर, हिवरी नगर, नेहरूननगर, प्रजापतीनगर, कुंभारटोली,, बारसेनगर आदी झोपडट्टीतील रहिवाशांना या डिमांड मिळायला सुरुवात झाली आहे. लवकरच शहरातील अन्य भागातील झोपडपट्टीधारकांच्या जागेच्या क्षेत्रफळानुसार डिमांड पाठविण्यात येणार आहे. डिमांड मिळताच हजारो रुपये कसे भरायचे असा प्रश्न झोपडपट्टीधारकांना पडला आहे.
स्लम भागात प्रामुख्याने मोलमजुरी करणारे, बांधकामावरील मजूर, रिक्षा चालक वा लहानसहान व्यवसाय क रणाऱ्यांची संख्या अधिक आहे. डिमांड मिळताच वर्षाला आठ ते दहा हजार कसे भरायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
डिमांडची होळी करणार
५००चौरस फूटापर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना कोणत्याही स्वरुपाचे शुल्क आकारले जाणार नाही, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. परंतु सरसकट सर्वच झोपडपट्टीधारकांना डिमांड पाठविण्यात येत आहे. यामुळे झोपडपट्टीधारक चिंतेत आहेत. शासनाने फसवणूक केल्याने डिमांडची रक्कम न भरण्याचा तसेच डिमांडची नासुप्र कार्यालयापुढे होळी करण्याचा निर्णय पँथरनगर येथे शहर काँग्रेसचे महासचिव माजी नगरसेवक अॅड. यशवंत मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बंडू बोरकर, अहमद हुसेन, राजू देशभ्रतार, इद्रीस रंगुबाई चांदेकर, अनिल काळे, भारत मेश्राम, बाबा चंद्रिकापुरे, शकुंतला पांडे, सुरेश तुरणकर, शहजाहा अन्सारी आदी उपस्थित होते, अशी माहिती यशवंत मेश्राम यांनी दिली.