लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या मार्गासाठी शेकडो वृक्ष तोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वृक्षतोड टाळा, फुटाळा तलाव स्वच्छ करावा, पाण्याचे स्रोत जिवंत करा, या मागण्यांसाठी विविध संघटना,पर्यावरणप्रेमी हजारोंच्या संख्येने फुटाळा तलावावर एकत्र आले. त्यांनी ‘भरत वन बचाना है’च्या घोषणा देऊन भव्य मानवी शृंखला करीत शेकडो वृक्ष तोडण्यास विरोध दर्शविला.फुटाळा तलावाचे सौंदर्यीकरण आणि म्युझिकल फाऊंटेन तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या प्रकल्पासाठी अॅप्रोच म्हणून भरतनगर, अमरावती रोड ते तेलंगखेडी हनुमान मंदिर हा नवीन रोड तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. हा प्रस्तावित मार्ग भरतवन या वन परिसरातून होत जाणार आहे. त्यासाठी वन परिसरातील शेकडो झाडांची कटाई केली जाणार असून, अशी झाडे चिन्हांकित करण्यात आली आहेत. चिन्हांकित करण्यात आलेली १५० च्यावर वृक्ष शंभर ते दीडशे वर्षे जुनी आहेत. या पुरातन झाडांसह लहान-मोठी दीड हजाराच्या जवळपास वृक्षांना मार्गासाठी तोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणाची मोठी हानी करणारा आहे. भरतवनच्या अधिवासात जवळपास १२० प्रजातींचे पक्षी आणि २२ मोरांचे वास्तव्य आहे. यामुळे निर्णयाने जैवविविधतेला हानी पोहचणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनानिमित्त फुटाळा तलावावर शहरातील हजारो पर्यावरणप्रेमी आणि संघटना सरसावल्या. यावेळी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे, वनराईचे सचिव नीलेश खांडेकर, अजय पाटील, महिला व बाल कल्याण सभापती प्रगती पाटील, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, नरु जिचकार, पर्यावरणप्रेमी गोपाळराव ठोसर, अरविंद पाटील, भरतनगर नागरिक समितीचे जयदीप दास यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी ७.३० वाजता विविध संघटनांसह हजारो नागरिक फुटाळा तलावावर गोळा झाले. त्यांनी तलावावर भव्य अशी मानवी शृंखला तयार केली. विकासाच्या नावावर पर्यावरणाची हानी पोहचविणारा प्रकल्प भविष्यात संकट निर्माण करणारा आहे. त्यामुळे सौंदर्यीकरणाला प्राधान्य देण्यापेक्षा पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून असा दुराग्रही प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.आंदोलनात ‘भारत वन बचाना है’, वृक्षतोड टाळा, पर्यावरणाचे रक्षण करा, ‘अपना वन, भारत वन, सेव्ह भारत वन’ आदी घोषणा दिल्या. ‘सेव्ह ट्री, सेव्ह भारतवन असे पोस्टर हातात घेऊन विविध संघटनांनी मानवी शृंखलेत सहभाग नोंदविला. जवळपास अर्धा तास नागरिकांनी भव्य मानवी शृंखला करून घोषणा देत आपल्या मागण्या रेटून धरल्या. यावेळी वनराई, भरतनगरचे नागरिक, सेव्ह अर्थ, ग्रीन व्हिजिल, गोरेवाडा जंगल ट्रॅकर्स, रोटरी क्लब, विदर्भ असोसिएशन, जेसीआय क्लब आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नव्या रस्त्याची गरज काय?फुटाळा तलावाला लागून एक मोठा रस्ता आहे. रविनगर चौक, सिव्हिल लाईन्स व सेमिनरी हिल्सकडूनही रस्ता आहे. वनराईच्या सदस्यांनी सतत २१ दिवस या मार्गांवरील वाहतुकीचे निरीक्षण केले. कुठल्याही रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होताना आढळले नाही. शहरात आधीच सिमेंटचे जंगल पसरले आहे. जे काही वृक्ष व वन परिसर राहिला आहे, तो टिकविणे आवश्यक आहे. असे असताना शेकडो वृक्षांची कत्तल करून नवीन मार्ग निर्माण करण्याची गरज काय, असा सवाल यावेळी पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला.विद्यार्थी अन् ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभागफुटाळा तलावावर विविध पर्यावरणप्रेमी संघटना एकत्र आल्या असताना विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनीही आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. आंदोलनात सीडीएस स्कूल, मॉडर्न स्कूल, एलएडी कॉलेज, स्कूल ऑफ स्कॉलर्स, सरस्वती स्कूल, रायसोनी कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय शहरातील विविध भागातील ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने मानवी शृंखलेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेले पालकही मानवी शृंखलेत सहभागी झाले होते. यावेळी हजारो नागरिक, विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले.
हजारोंची मानवी शृंखला : पर्यावरणासाठी संघटनांनी केला आवाज बुलंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 11:29 PM
फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या मार्गासाठी शेकडो वृक्ष तोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वृक्षतोड टाळा, फुटाळा तलाव स्वच्छ करावा, पाण्याचे स्रोत जिवंत करा, या मागण्यांसाठी विविध संघटना,पर्यावरणप्रेमी हजारोंच्या संख्येने फुटाळा तलावावर एकत्र आले. त्यांनी ‘भरत वन बचाना है’च्या घोषणा देऊन भव्य मानवी शृंखला करीत शेकडो वृक्ष तोडण्यास विरोध दर्शविला.
ठळक मुद्देवृक्षतोड टाळा, पर्यावरणाचे करा रक्षण