सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत मधुमेहाची उपराजधानी ठरत आहे. एकट्या भारतात ७० लाख तर नागपुरात तीन लाख लोक मधुमेहाने पीडित आहेत. त्यातही ‘टाईप-१’ या वर्गातील म्हणजे लहान मुलांपासून वृद्धांना भेडसावणाऱ्या व फक्त इंजेक्शन इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या मधुमेहींची संख्या प्रमाणाबाहेर वाढत आहे. नागपुरात असे सुमारे ३० हजार रुग्ण आहेत. हे रुग्ण दिवसातून एक ते चारवेळा इन्सुलिन घेतात. यातील मोजकेच रुग्ण वापरलेले इंजेक्शन डॉक्टरांकडे देतात, परंतु बहुसंख्य रुग्ण थेट कचऱ्यात फेकतात. याची संख्या २५ हजारावर असल्याचे बोलले जाते. या जैविक कचऱ्यामुळे नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बदलत्या जीवनशैली आणि आहार यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागपूर शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत साधारण १० टक्के म्हणजे तीन लाख लोक मधुमेहाने पीडित आहेत.घराघरातून निघणाऱ्या ‘बायोमेडिकल वेस्ट’कडे दुर्लक्ष‘बायोमेडिकल वेस्ट’ म्हणजे जैविक कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया, उपचार व विल्हेवाट यांचे व्यवस्थापन मानव व पर्यावरणासाठी निकोप होण्याच्या दृष्टीने कठोर नियम आहेत. बहुसंख्य इस्पितळे याचे कठोरतेने पालनही करतात. परंतु अनेक घरांमध्ये रुग्णांसाठी वापरण्यात आलेले कॉटन, बँडेज, औषधे, इंजेक्शन व सिरिंज थेट सामान्य कचऱ्यात फेकतात. यात कचऱ्यात आढळून येणाऱ्या इन्सुलिनची संख्या मोठी आहे. मनपाने यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गंभीर आजाराचा धोका - गिल्लूरकरमधुमेह तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर म्हणाले, कचऱ्यात विविध प्रकारचे जीवाणू-विषाणू असतात. यात वापरलेल्या सिरिंज पडून राहिल्यास आणखी गंभीर आजाराचा धोका वाढतो. विशेष म्हणजे, कचरा उचलणारे सुई टोचल्यावर डॉक्टरांकडे फार कमी जातात. दुसरीकडे घराघरातील कचरा वसाहतीत जमा करून नंतर तो डम्पिंग यार्डकडे जातो. अशा कचऱ्यावर मोकाट जनावरे चरतात. यामुळे या छोट्याशा जखमेचा भविष्यात मोठा घातक परिणाम होऊ शकतो. शिवाय, ‘हिपेटायटिस’ किंवा ‘एचआयव्ही’ किंवा इतर गंभीर आजाराचा धोका होऊ शकतो. यामुळे रुग्णांमध्ये याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.
नव्या मार्गदर्शक तत्त्वांची गरज - गुप्तामधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता म्हणाले, शहरात इन्सुलिन घेणाऱ्या ‘टाईप-१’ मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. यातील काही रुग्णांना दिवसातून एकवेळा तर काहींना दोन ते चारवेळा इन्सुलिन घ्यावे लागते. प्रत्येक वेळी नव्या सिरिंजचा वापर करण्याचा नियम आहे. परंतु यावरील खर्च सामान्यांच्या आवाक्या बाहेरचा आहे. यामुळे काही रुग्ण एका सिरिंजचा दोनपेक्षा जास्तवेळा वापर करतात. याबाबत व वापरलेल्या इंजेक्शनच्या विल्हेवाटीबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व तयार होणे आवश्यक आहे.