नागपूर : तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते १६ जानेवारीला नागपूर येथील ‘राजभवनला’ घेराव घालणार आहेत. या आंदोलनाचा आवाज दिल्लीपर्यंत कसा पोहचेल, यासाठी विशेष रणनीती आखली गेली आहे. सुमारे ७०० ट्रॅक्टर व १५ हजारावर कार्यकर्ते राजभवनावर कूच करून घेराव घालणार आहेत.
राज्यपाल भगतिसंग कोश्यारी हे १२ ते १७ जानेवारी नागपुरात असल्यामुळे काँग्रेसनेही मुंबईचे आंदोलन नागपुरात वळवले. काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनाची जोरात तयारी चालविली आहे. गुरुवारी अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव आशिष दुआ, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, अतुल कोटेचा, मुजीब पठाण, संदेश सिंगलकर आदींनी राजभवनाचे दोन्ही प्रवेशद्वार व परिसराची पाहणी केली. यानंतर रात्री पालकमंत्री नितीन राऊत व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी स्थानिक नेत्यांची बैठक घेतली. जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने येणाऱ्या कार्यकर्त्यांना राजभवनाच्या चारही दिशेने असलेल्या जवळच्या चौकात गोळा केले जाईल. यानंतर चारही दिशेने मोर्चा राजभवनावर धडकेल. शेवटी एक जाहीर सभा होईल. यानंतर काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी जाता यावे, याची परवानगी घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांवर वाढला ताण
- कोरोना अद्याप संपलेला नाही. अशातच राजभवनाला घेराव करण्यासाठी हजारो काँग्रेस कार्यकर्ते नागपुरात जमणार आहेत. राजभवनासारख्या संवेदनशील ठिकाणाची सुरक्षा व हजारो कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्याचा दुहेरी ताण पोलिसांवर आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार ही परिस्थिती हाताळण्यासाठी कामाला लागले आहेत.