नागपुरात टॉवरवर चढून आत्महत्या करण्याची पथकाला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:57 AM2018-04-18T00:57:31+5:302018-04-18T00:57:42+5:30
महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक पोहचताच सिवरेज लाईनवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या सचिन थोरात याने टॉवरवर चढल्यानंतर उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. पथकातील कर्मचाऱ्याने त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला असता त्याने विट फेकून मारली. सोबतच परिसरातील लोकांनीही कारवाईला विरोध दर्शविल्याने अखेर पथक माघारी फिरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक पोहचताच सिवरेज लाईनवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या सचिन थोरात याने टॉवरवर चढल्यानंतर उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. पथकातील कर्मचाऱ्याने त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला असता त्याने विट फेकून मारली. सोबतच परिसरातील लोकांनीही कारवाईला विरोध दर्शविल्याने अखेर पथक माघारी फिरले.
शांताबाई थोरात यांनी घराचे बांधकाम क रताना सिवरेज लाईनच्या काही भागावर अतिक्रमण केले. १३ सप्टेंबर २०१७ रोजी याची तक्रार त्यांच्या शेजारी ज्योती गोडसुंदरे यांनी महापालिका कार्यालयाकडे केली होती. त्यानंतर त्यांनी लोकशाही दिनातही तक्रार केली होती. यावर अतिक्रमण विरोधी पथकाने थोरात यांना नोटीस बजावून अतिक्रमण हटविण्यास सांगितले. परंतु अतिक्रमण न हटविल्याने मंगळवारी धंतोली झोनचे पथक कारवाईसाठी पोहचले होते.
या वस्तीतील अनेक लोकांनी सिवरेज लाईनवर अतिक्रमण केल्याची माहिती सचिन थोरात यांनी दिली. त्यामुळे कारवाई एकट्याच्या विरोधात का, असा सवाल त्याने पथकाला केला. अखेर पथकाने १५ दिवसाची मुदत देऊन व पथकाचा खर्च म्हणून पाच हजाराचा दंड वसूल करून पथक माघारी फिरले. प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे, नितीन मंथनवार, संजय शिंगणे, जमशेद अली, शरद इरपाते यांच्यासह पोलीस पथक कारवाईत सहभागी झाले होते.
पाच ट्रक साहित्य जप्त
आशीनगर झोनच्या पथकाने यशोधरानगर परिसरातील टिपू सुलतान चौकापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी या मार्गावरील १५ अतिक्रमण हटविले. पाच पानठेले, टायर्स विक्रेते, हॉटेल, चिकन विक्रे त्यांची दुकाने, किराणा दुकान, सायकल स्टोर्स यांच्यासह विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले. येथून ट्रकभर साहित्य जप्त केले. दुसऱ्या पथकाने गीतांजली टॉकीज परिसरातील शाहू पाणीपुरीचा ठेला व दोन ट्रक साहित्य जप्त केले. महाल झोनच्या पथकाने देवडिया स्कूल परिसरातील अतिक्रमणांचा सफाया केला.
सिवरेज लाईनवर अतिक्रमण
शहराच्या सर्वच भागात मोठ्या प्रमाणात सिवरेज लाईनवर अतिक्रमण करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात सर्वसाधारण सभेत महापौरांनी सिवरेज लाईनवरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. परंतु अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.