लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने मंगळवारी तीन आरोपींना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील आहे.विश्वास राजेश दहीवले (३०), सूरज राजू मानवटकर (२३) व कमलेश कालीचरण पाटील (३०) अशी आरोपींची नावे आहेत. दहीवले न्यू इंदोरा, मानवटकर महादुला तर, पाटील पुलगाव, जि. वर्धा येथील रहिवासी आहे. मयताचे नाव राकेश बापुराव रामटेके (४५) होते. तो बाराखोली येथे रहात होता. २९ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री ११ च्या सुमारास आरोपींनी रामटेकेला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावरून त्यांचा रामटेकेसोबत वाद झाला. दरम्यान, आरोपींनी रामटेकेला लाकडी स्टम्प व दांड्याने जबर मारहाण केली. त्यामुळे रामटेके गंभीर जखमी होऊन ठार झाला. रामटेकेची पत्नी वैशालीने आरोपींविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून तिन्ही आरोपींना ३० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक बी. पी. सावंत यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अभय जिकार यांनी काम पाहिले.