एमआयडीसीतील वृद्ध महिलेच्या हत्याकांडाचा पर्दाफाश, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 03:17 PM2021-05-16T15:17:16+5:302021-05-16T15:18:17+5:30
विजयाबाई यांची हत्या झाल्याचे शुक्रवारी दुपारी उघड झाले. हत्या करणाऱ्या आरोपींनी त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने लंपास केल्याचाही संशय होता.
नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर या ६५ वर्षीय वृद्धेची हत्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. मोठी रोकड आणि दागिने मिळणार असा अंदाज असल्याने आरोपींनी ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.
विजयाबाई यांची हत्या झाल्याचे शुक्रवारी दुपारी उघड झाले. हत्या करणाऱ्या आरोपींनी त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने लंपास केल्याचाही संशय होता. गेल्या ३६ तासांत पोलिसांनी दोन डझनपेक्षा जास्त व्यक्तींची कसून चौकशी केली. त्यातून पोलिसांच्या हातात धागेदोरे लागले. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी कळमना परिसरात शनिवारी रात्री बाबा, नीलेश पौनिकर आणि फरदीन खान या तिघांना अटक केली. त्यांचे तीन साथीदार फरार असून त्यांनाही लवकरच अटक करू, असा विश्वास पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत.