आॅनलाईन लोकमतनागपूर : महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यातील दोन कर्मचारी कर विभागातील तर एक अग्निशमन विभागातील आहे. हनुमाननगर झोनमध्ये कर संग्राहक (प्रभारी कर निरीक्षक) सचिन मेश्राम व नेहरूनगर झोनमधील कनिष्ठ निरीक्षक जवाहर धोंगडे हे सहायक आयुक्तांच्या कॉम्प्युटरचा पासवर्ड चोरून हजारो रुपयांचा मालमत्ता कर कमी करून देत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोबतच सक्करदरा अग्निशमन केंद्राचे प्रभारी स्थानाधिकारी व्ही.आर. वंजारी यांनाही शिस्तभंगावरून निलंबित करण्यात आले आहे.हनुमाननगर झोनमध्ये ५४ हजार रुपये मालमत्ता कराची डिमांड आली असताना ती कमी करून ४५०० रुपये करण्यात आली. संबंधित प्रकरण माजी महापौर प्रवीण दटके यांनी महापालिकेच्या सभागृहात लावून धरले. सहायक आयुक्तांच्या कॉम्प्युटरचा पासवर्ड या कर्मचाºयांपर्यंत कसा पोहचला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. शेवटी पासवर्ड चोरी करणाऱ्यांवरच कारवाई झाली. धोंगडे यानेही पासवर्ड चोरून टॅक्सची हेराफेरी केली होती. या प्रकारामुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला. या प्रकरणाची आयुक्त अश्विन मुदगल यांनी गंभीर दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेतील सूत्रांच्या मते या प्रकरणी आणखी काही अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. झोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही याप्रकरणी योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसणार नाही.सक्करदरा अग्निशमन केंद्राचे प्रभारी स्थानाधिकारी व्ही.आर. वंजारी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले. वंजारी यांच्यावर दारू पिऊन कामावर आल्याचा तसेच शिस्तभंगासह आणखी काही आरोप लावण्यात आले आहेत. सूत्रांच्या मते वंजारी यांनी भाजपा नेत्याच्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनात काही अडथळा निर्माण केला होता. यानंतरच त्यांच्यावर कारवाई झाल्याची चर्चा आहे.
पासवर्ड चोरून कर कमी करणारे नागपूर मनपाचे तीन कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 8:32 PM
महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यातील दोन कर्मचारी कर विभागातील तर एक अग्निशमन विभागातील आहे. हनुमाननगर झोनमध्ये कर संग्राहक (प्रभारी कर निरीक्षक) सचिन मेश्राम व नेहरूनगर झोनमधील कनिष्ठ निरीक्षक जवाहर धोंगडे हे सहायक आयुक्तांच्या कॉम्प्युटरचा पासवर्ड चोरून हजारो रुपयांचा मालमत्ता कर कमी करून देत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ठळक मुद्देमेश्राम, धोंगडेवर कारवाई : अग्निशमन केंद्र प्रभारी स्थानाधिकारीवरही संक्रांत