लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात प्लास्टिकबंदी लावल्यानंतर त्रस्त उद्योजक आणि व्यावसायिकांना राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलासा दिला आहे.उद्योजकांशी चर्चेदरम्यान राज्यात बंदीचा विपरीत परिणाम पाहता प्लास्टिकबंदीला मुनगंटीवार यांनी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. यादरम्यान अनेक पर्यायांवर विचार करण्यात येणार असल्याची माहिती प्लास्टिक उद्योग संघर्ष समितीचे प्रमुख गिरधारी मंत्री यांनी दिली.मंत्री यांनी सांगितले की, समितीची मुनगंटीवार यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली. प्लास्टिकबंदीचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला आहे, यावर उद्योजकांनी त्यांना माहिती दिली. बंदीमुळे प्लास्टिकच नव्हे तर त्यावर अवलंबून असणारे अनेक उद्योग, गृहउद्योग आणि व्यावसायिक संकटात आले आहेत. त्यामुळे बंदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी चर्चेदरम्यान करण्यात आली. यावर मुनगंटीवार यांनी सांगितले की, यासंदर्भात राज्यात तीन महिन्यात कोणतीही कारवाई होणार नाही. त्याला मुख्यमंत्र्यांनी होकार दिला आहे. मंत्री म्हणाले, रि-सायकलिंग आणि पर्यावरणाशी जुळलेल्या अन्य मुद्यांवर विचारविनिमय सरकारसोबत बैठकीदरम्यान करण्यात येईल. याकरिता बैठकीची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.
प्लास्टिकबंदीला तीन महिन्यांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 1:22 AM
राज्यात प्लास्टिकबंदी लावल्यानंतर त्रस्त उद्योजक आणि व्यावसायिकांना राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलासा दिला आहे.उद्योजकांशी चर्चेदरम्यान राज्यात बंदीचा विपरीत परिणाम पाहता प्लास्टिकबंदीला मुनगंटीवार यांनी तीन महिन्यांची मुदत दिली आहे.
ठळक मुद्दे मुनगंटीवार यांचे आश्वासन : कारवाई होणार नाही