लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘अतिदक्षता विभाग-१’मधील ऑक्सिजन पुरवठा रविवारी पहाटे अचानक बंद झाल्याने एका मागे एक तीन रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली. तूर्तास मेडिकल प्रशासनाने हे आरोप फेटाळले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवरत्न शेंडे (५६, रा. सिद्धार्थनगर कोरोडी), अमोल नाहे (२४, रा. संग्रामपूर, बुलढाणा) व नरेश मून (६३, रा. वॉर्ड क्र. १ महादुला) अशी मृत रुग्णांची नावे आहेत.
अपघातातील जखमी रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला कोरोनाचे रुग्ण वाढताच ६०० खाटांच्या ‘कोविड डेडिकेटेड सेंटर’मध्ये रुपांतरीत केले. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने व सेंटरमध्ये नवीन लिक्विड ऑक्सिजन प्लांट स्थापन केले जात असल्याने येथील कोरोनाबाधितांना मेडिकलच्या नव्या अतिदक्षता विभागात स्थानांतरीत करण्यात आले, परंतु कोरोनाच्या संशयित गंभीर रुग्णांना व शस्त्रक्रियेची गरज असलेल्या कोरोनाचा रुग्णांना ट्रॉमा केअर सेंटरमध्येच ठेवले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमोल नाहे या युवकाला शुक्रवारी सकाळी, शिवरत्न शेंडे यांना शनिवारी सायंकाळी तर नरेश मून या वृद्धाला रविवारी पहाटे ३ वाजता ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘अतिदक्षता विभाग-१’मध्ये (आयसीयू) भरती करण्यात आले होते. कोरोना संशयित म्हणून तिघांवर उपचार सुरू होते. त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले. तिघांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण फारच कमी होते. प्रकृती गंभीर असल्याने तिघांनाही ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ‘आयसीयू-१’मधील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. यामुळे एकामागे एक या तिन्ही रुग्णांचा मृत्यू झाला. अचानक रुग्णांच्या मृत्यूने गोंधळ उडाला. याची माहिती वरिष्ठांना मिळताच त्यांनी तातडीने दुरुस्ती करून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केला. ऑक्सिजन पुरवठा अर्ध्या तासापर्यंत खंडित झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
-दोन दिवसांपूर्वी ऑक्सिजनची गळती
दोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी ट्रॉमा केअर सेंटरच्या ‘आयसीयू’मध्ये ऑक्सिजनच्या पाईपलाईनमधून गळती लागली होती. एका सुरक्षा रक्षकाच्या लक्षात ही बाब लक्षात आली. त्याने तातडीने आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली. यामुळे मोठा धोका टळल्याचे सूत्राने सांगितले.
-प्रकरणाची चौकशी केली जाईल
ट्रॉमा केअर सेंटरमधील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा अद्ययावत प्रणालीने होतो. रविवारी पहाटे ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याचा कोणताही रिपोर्ट नाही, परंतु या दरम्यान काही वेळेसाठी पुरवठा कमी जास्त झाल्याची नोंद आहे. मृत्यू झालेल्या तिन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर होती. एका मागे एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्याचा संबंध ऑक्सिजन खंडित झाल्याशी लावणे चुकीचे आहे. या संदर्भात कुणाची तक्रारही प्राप्त नाही. परंतु या घटनेची चौकशी केली जाईल.
-डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल