नागपुरात दोन तरुणींसह तिघांनी लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:19 AM2018-07-08T01:19:20+5:302018-07-08T01:22:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन तरुणींसह तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली. यातील एका व्यक्तीची ओळख पटलेली नाही.
अजनीतील रामेश्वरीत राहणारी दीपाली कैलास रगडे (वय २१) हिने शनिवारी सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. ती मूळची वरुड येथील जागृती शाळेजवळची रहिवासी होती. तिची आई शांता कैलास रगडे (वय ४०, रा. जागृती शाळेजवळ, इंदिरा चौक, वरुड) यांनी दिलेल्या सूचनेवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अशाच प्रकारे कळमन्यातील गुलमोहरनगर, गिरनार बँकेच्या मागे राहणारी खिल्लेश्वरी राजू शाहू (वय २०) हिने शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. राजू हेमू शाहू (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
गणेशपेठेतील लोधीपुऱ्यात ३२१ क्रमांकाच्या घरात राहणाºया एका अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाच्या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली.
शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हेमराज शंभू सरोज (वय ७३) यांनी दिलेल्या सूचनेवरून गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
वाहून गेलेल्याचा मृतदेह आढळला
जोरदार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या एका ३० ते ३८ वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवकृपा नगरातील नाल्यात आढळून आला. शनिवारी सकाळी ९.३० वाजता पोलिसांना ही माहिती मिळाली. रमेश किसनराव कटुके (वय ५८, रा. रेल्वे पोलीस क्वॉर्टर, अजनी) सूचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी मृत्यूची नोंद केली. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.
‘ओव्हर फ्लो’चे दृश्य जीवावर बेतले
त्रिमूर्ती नगर, भामटी निवासी मुकेश केसरीचंद साखरे (वय २२) आणि त्याचा भाऊ अज्जू सहारे (वय २४) हे दोघे अंबाझरी तलावावर ओव्हर फ्लोचे दृश्य बघण्यासाठी शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास गेले होते. अचानक वीज कडाडली. त्यामुळे घाबरलेला मुकेश भिंतीवर पडला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मुकेशचा करुण अंत झाला.