नागपुरातील जरीपटक्यात तीन पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:25 AM2020-07-22T00:25:29+5:302020-07-22T00:27:11+5:30
जरीपटका पोलिसांनी एका कुख्यात गुंडाला ताब्यात घेऊन त्याच्या घरातून तीन पिस्तूल तसेच घातक शस्त्रे जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटका पोलिसांनी एका कुख्यात गुंडाला ताब्यात घेऊन त्याच्या घरातून तीन पिस्तूल तसेच घातक शस्त्रे जप्त केली. लॉरेन्स ऊर्फ रॉकी हेन्ड्री कुटीनो (वय ४१) असे आरोपीचे नाव असून, तो मार्टिननगरातील ख्रिश्चन कॉलनीत राहतो. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती कळल्यामुळे जरीपटक्यातील पोलीस उपनिरीक्षक महादेव गणपत नाईकवाडे, हवालदार हरिश्चंद्र भट, शिपाई उमेश सांगळे, संदीप वानखेडे, महिला शिपाई अश्विनी आणि छत्रपाल चौधरी यांनी सोमवारी मध्यरात्री आरोपी रॉकी याच्या घरी छापा घातला. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे एक पिस्टल, एक देशीकट्टा आणि एक छऱ्र्याची बंदूक सापडली सोबतच आरोपीकडे चाकू, तलवार आणि भाल्याचे पातेही आढळले. पोलिसांनी ते जप्त केले. आरोपी रॉकीला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे.
सिनेस्टाईल कारवाई
आरोपी रॉकीच्या घरी पोलिसांनी धडक देऊन त्याला दार उघडण्यासाठी पोलिसांनी बरेच आवाज दिले. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. रॉकीचा भाऊ बाहेर आला असता त्याला पोलिसांनी विचारणा केली. त्याने दार तोडून आत जा, असे पोलिसांना सांगितले. रॉकीच्या घराच्या बाजूला एक झाड आहे. त्या झाडावरून चढून पोलीस रॉकीच्या घरात शिरले आणि त्यांनी ही कामगिरी बजावली.