निशांत वानखेडे
नागपूर : मानवाने केलेली अस्वच्छता केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही तर अंतराळातही कचऱ्याचे ढिगारे साचवून ठेवले आहेत. अर्थात हा कचरा अंतराळाचा शाेध घेण्याच्या माेहिमेमुळे झाला आहे. हा कचरा थाेडाथाेडका नाही तर लक्षावधी टनांचा आहे. सध्या पृथ्वीभाेवती दोन हजार सॅटेलाइट भ्रमण करीत आहेत. मात्र, निकामी झालेले तीन हजार मृत सॅटेलाइट आणि अशा उपकरणांचे लहान-माेठे लक्षावधी तुकडे केवळ पृथ्वीच्या कक्षेत विखुरले आहेत. हा कचरा नष्ट करणे हे जगभरातील अंतराळ संशाेधकांपुढचे आव्हान आहे.
शनिवारी रात्रीच्या सुमारास आकाशातून पडलेल्या वस्तूंचे अवशेष विदर्भात ठिकठिकाणी सापडत आहेत. हे अवशेष उपग्रह वाहून नेणाऱ्या राॅकेट बूस्टरचे असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ते कुठल्या देशाने नुकतेच साेडलेल्या उपग्रहाचे आहेत की अंतराळात आधीच असलेल्या कचऱ्याचे आहेत, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे अंतराळात मानवी उपकरणांचा किती कचरा आहे, त्याचा काय धाेका हाेऊ शकताे, याबाबत रमन विज्ञान केंद्राचे खगाेल शिक्षक महेंद्र वाघ यांच्याकडून आढावा घेण्याचा प्रयत्न ‘लाेकमत’ने केला.
साधारणत: १९५० च्या दशकात मानवाने अंतराळात शाेधमाेहीम सुरू केली. मग आपल्या पृथ्वीचे स्वरूप, तारामंडळ, विविध ग्रह, उपग्रह यांचा अभ्यास करण्याच्या माेहिमा भारतासह विविध देशांनी आतापर्यंत राबविल्या. आता तर बहुतेक देशांचे संचार क्षेत्र सॅटेलाइटच्या भरवशावर चालले आहे. मग विविध देशांचे अनेक यान, हजाराे सॅटेलाइट अंतराळात गेले, पृथ्वीभाेवती फिरू लागले. या प्रत्येक माेहिमेत थाेडा-थाेडा करीत उपकरणांचे लक्षावधी टन कचऱ्याचे ढिगारे अंतराळात पडले आहेत. त्यातला काही पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात येऊन जळताे किंवा जमिनीवर पडताे. मृत उपग्रह, त्याचे पार्ट, राॅकेटचे तुकडे आणि साेबत नेलेल्या वस्तूंचे अवशेष तेथेच राहिले आहेत.
किती आहे स्पेस जंक?
- २००० सॅटेलाइट सध्या पृथ्वीभाेवती भ्रमण करीत आहेत.
- ३००० मृत सॅटेलाइट पृथ्वीच्या कक्षेत पडले आहेत.
- ३४,००० स्पेस जंकचे १० सेंटिमीटरपेक्षा माेठे तुकडे पडलेले आहेत.
- १ मिलिमीटरपेक्षा माेठे स्पेस जंकचे १२८ दशलक्ष तुकडे पृथ्वीभाेवती पडले आहेत.
- १०,००० मध्ये एकदा हे तुकडे मानवी यान किंवा सॅटेलाइटला धडकण्याचा धाेका आहे.
- २००९ ला एक व त्यानंतर मार्च २०२१ ला चीनचे सॅटेलाइट या कचऱ्याला धडकून नष्ट झाले हाेते.
चंद्रावरही पडला आहे कचरा
- १९५९ मध्ये रशियाच्या ‘लुना-२’ पासून अमेरिकेचे रेंजर-४, जपानचे हिटन, युराेपचे स्मार्ट-१, भारताचे चंद्रयान-१, चीनचे चँग-१ व इजराईलचे बेरशीट यान चंद्रावरच साेडण्यात आले हाेते.
- अमेरिकेच्या अपाेलाे १५, १६ व १७ यानात नेलेल्या तीन ‘मून बग्गी’ तेथेच आहेत.
- ५४ मानवविरहित यान चंद्रावर उतरले किंवा क्रॅश झाले.
- १,९०,००० किलाेग्रॅम साहित्य मानवाने चंद्रावर साेडले आहे.
- याशिवाय अंतराळवीरांनी ठेवलेले फाेटाेग्राफ, गाेल्फ बाॅल व इतर साहित्य चंद्रावर असतील.
अनेक अंतराळ संशाेधक संस्थांनी मृत सॅटेलाइट जागेवर किंवा माेठे जाळे, चुंबक किंवा कुठल्या तरी शक्तीने पृथ्वीवर आणून नष्ट करण्याचे उपाय सुचविले आहेत. मात्र, ते केवळ माेठ्या उपग्रहापुरते मर्यादित आहेत. लक्षावधी लहान तुकडे नष्ट करणे हे आव्हान आहे. सध्या धाेका दिसत नसला तरी भविष्यात त्याचे नुकसान मानवाला हाेणारच आहे.
- महेंद्र वाघ, खगाेल शिक्षक, रमन विज्ञान केंद्र.