पोलीस व्हॅनमध्ये कुख्यात गुंडाचा ‘टिक-टॉक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:42 AM2019-05-10T00:42:50+5:302019-05-10T09:29:24+5:30
पोलीस व्हॅनमध्ये एका कुख्यात गुंडाने ‘टिक टॉक ' व्हिडिओ बनविला. गुंडाचा हा टिक टॉक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
नागपूर : पोलीस व्हॅनमध्ये एका कुख्यात गुंडाने ‘टिक टॉक ' व्हिडिओ बनविला. गुंडाचा हा टिक टॉक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. लपवण्यासाठी कोराडी पोलिसांनी शासकीय वाहनाचा गैरवापर करण्याच्या आरोपाखाली कुख्यात गुंड सैयद मोबीन अहमद (रा. संघर्ष नगर, टिपू सुलतान चौक) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. कुख्यात मोबीन हा कुख्यात चामा टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो सध्या तडीपारसुद्धा आहे. काही दिवसांपूर्वी मोबीनचा भाऊ सेबू याला यशोधरानगर पोलिसांनी वाहन चोरीच्या आरोपात अटक केली होती. चामा टोळी मोठी वाहने चोरी करून त्याचा जनावरांची तस्करी करण्याासाठी वापर करते.
पोलिसांनी वाहन पकडल्यास चालक वाहन सोडून पळून जातो. त्यामुळे चामा टोळीचे कोणतेही नुकसान होत नाही. मोबीनविरुद्ध
वरोरा, वणी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यात खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. मोबीनने पोलिसांवरही हल्ले केले आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोबीनचे गुंड गुरे चोरण्याची कामे करतात. ती गुरे आदिलाबाद येथे कत्तलीसाठी विकल्या जातात. आतापर्यंत मोबीनची अनेक वाहने वणी, राजनांदगाव येथील पोलीस ठाण्यात जप्त आहेत. अशा या कुख्यात गुंडासोबत अर्थपूर्ण मैत्री करणाऱ्या पोलिसांनी त्याला शासकीय वाहनात नेताना भाऊबंदासारखी वागणूक दिली. त्याला मोबाईलही हाताळू दिला. या मोबाईलमध्ये बसून मोबिनने कोराडी परिसरात आपला ‘टिक टॉक ' व्हिडिओ बनविला. तो मित्रांना तसेच गुंड साथीदारांना पाठविला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात पोलिसांचे वाहनही दिसते. या प्रकारामुळे पोलिसांची प्रतिमा चांगलीच मलिन झाली. दरम्यान, प्रसार माध्यमातून हा टीकेचा विषय ठरल्याने सावरासावर करण्यासाठी कोराडी पोलिसांनी मोबीनविरुद्ध गुरुवारी शासकीय वाहनाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल केला.
त्या पोलिसांचे काय?
मोबीनविरुद्ध जुजबी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, त्याला व्हिडीओ बनविण्याची मुभा देणाऱ्या पोलिसांवर कोणती कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित झाला असून, वरिष्ठांमध्ये या संबंधाने कारवाईसाठी मंथन सुरू असल्याचे समजते.