त्याच्यासाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:49 AM2018-10-11T00:49:02+5:302018-10-11T00:52:02+5:30
धावत्या रेल्वेगाडीतून पडल्यानंतर सहसा कुणी जिवंत वाचत नाही. परंतु काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा प्रत्यय बुधवारी रात्री नागपूर विभागातील वरोरा रेल्वेस्थानकाजवळ आला. धावत्या रेल्वेगाडीतून पडूनही एक प्रवासी सुखरुप नागपुरात पोहोचल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धावत्या रेल्वेगाडीतून पडल्यानंतर सहसा कुणी जिवंत वाचत नाही. परंतु काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा प्रत्यय बुधवारी रात्री नागपूर विभागातील वरोरा रेल्वेस्थानकाजवळ आला. धावत्या रेल्वेगाडीतून पडूनही एक प्रवासी सुखरुप नागपुरात पोहोचल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.
दिवाणसिंग प्रेम साय (५०) रा. प्रतापपूर, छत्तीसगड असे जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्यांचा मुलगा विजयवाडा येथील शाळेत सातव्या वर्गात शिकतो. मुलाला घेण्यासाठी ते पुतणीसह विजवाड्याला गेले होते. मुलाला घेऊन परत येत असताना १६०९३ लखनौ एक्स्प्रेसच्या बी-२ कोचमधील ५५, १६ आणि १३ क्रमांकाच्या बर्थवरून ते प्रवास करीत होते. दिवाणसिंग हे रेल्वेगाडीच्या कोचच्या दारावर उभे होते. वरोरा रेल्वेस्थानकावर अचानक त्यांचा तोल गेला. ते धावत्या गाडीतून खाली पडले. याबाबत मुलाला आणि पुतणीला काहीच समजले नाही. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी आल्यानंतर वडील दिसत नसल्यामुळे मुलगा त्याची चुलत बहीण घाबरले. त्यांनी आरपीएफ ठाणे गाठून घडलेली घटना सांगितली. लगेच आरपीएफने वरोरा येथे संपर्क साधला असता वरोरा आरपीएफने त्यांची शोधाशोध केली. अखेर ते रेल्वे रुळाशेजारी बसून दिसले. प्रथमोपचारानंतर त्यांना दुसऱ्या गाडीने नागपुरात पाठविण्यात आले. येथे आल्यानंतर त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी उशिरा त्यांचे कुटुंबीय नागपुरात दाखल झाले. उपचारानंतर ते कुटुंबीयांसह बिलासपूरला रवाना झाले.