लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा कोरोनामुळे प्रशासनाने न्यू इयर पार्टीच्या आयोजनावर वेळेची मर्यादा आणल्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संचालक नाराज आहेत. त्यामुळे अनेक संचालकांनी न्यू इयर पार्टीचे आयोजन न करता नेहमीप्रमाणेच प्रतिष्ठान बंद करून घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे तर काहींनी इव्हिनिंग पार्टीवर भर दिला आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक नुकसानीत असलेले संचालक न्यू इयर पार्टीसाठी वेळेची मर्यादा शिथिल करण्याची मागणी करीत आहेत.
नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी होणाऱ्या आयोजनाने हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे अनेक रेस्टॉरंटने रात्रीऐवजी सायंकाळी आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक संचालक सायंकाळी ६ ते १० या वेळेत आयोजन करणार आहेत. याकरिता सोशल मीडियाद्वारे प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. काही मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह ग्राहकांनाही आयोजन हवे आहे. नियमित ग्राहकांकडूनही आग्रह करण्यात येत आहे. त्यामुळे नाईट पार्टीऐवजी इव्हनिंग पार्टी करण्याचा हॉटेल व रेस्टॉरंट संचालकांनी निर्णय घेतल्याची माहिती आहे.
आयोजनांतर्गत अनेक हॉटेल्सतर्फे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जेवणाची व्यवस्था राहणार आहे. शिवाय मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद लोकांना घेता येईल. हॉटेल संचालक म्हणाले, संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन मर्यादित लोकांसाठी करण्यात येणार आहे. बैठकीच्या व्यवस्थेनुसार लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. अशाच प्रकारचे कार्यक्रम नागपुरात अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये होणार आहेत. त्यामुळे व्यवसायही होईल आणि लोकांची इच्छा पूर्ण होणार आहे.
नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, कोरोना नियमाचे पालन करण्यासह हॉटेल्स व रेस्टॉरंट संचालकांना वेळेत शिथिलता द्यावी. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही.
नंदनवन येथील राम भंडारचे संचालक वसंत गुप्ता म्हणाले, प्रशासनाने केवळ ३१ डिसेंबरकरिता वेळ वाढवून द्यावी. त्यामुळे लोकांना न्यू इयर पार्टी आनंदाने साजरी करता येईल.