नागपूर : मध्य नागपुरातील टिमकी परिसरातील नागरिक अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. गडरलाइन, रस्ते, स्वच्छता, असामाजिक तत्त्वांमुळे ते त्रस्त झाले आहेत. महापालिकेत सर्व टॅक्स भरूनही आम्हाला सुविधा का उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत.
नाला, गडरलाइनची दुर्गंधी
टिमकी परिसरात वारंवार गडरलाइन चोकअप होते. त्यामुळे नागरिकांच्या घरात घाण पाणी शिरते. अनेकदा निवेदने देऊनही गडरलाइनची देखभाल करण्यात येत नाही. या भागात २०० मीटरला नाला आहे; परंतु या नाल्याची सुद्धा सफाई करण्यात येत नाही. रेल्वे लाइनच्या भागातही एक नाला आहे. या नाल्याची सफाई होत नसल्यामुळे नागरिकांच्या घरासमोर घाण पाणी साचते. परिसरात नेहमीच नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या भागातील गडरलाइन, नाल्यांची सफाई करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
असामाजिक तत्त्वांचा उपद्रव
परिसरात महानगरपालिकेची महापालिका हंसापुरी हिंदी माध्यमिक शाळा आहे. या शाळेत दिवसभर सुरक्षारक्षक उपस्थित राहतो; परंतु रात्री सुरक्षारक्षक राहत नसल्यामुळे शाळेच्या आवारात असामाजिक तत्त्व गोळा होतात. तेथे दारू पिणे, जुगार खेळणे, गांजा पिणे, असे प्रकार घडतात. यामुळे या भागातील महिला, नागरिक त्रस्त झाले आहेत. शाळेत पूर्वी पोलीस चौकी होती; परंतु आता पोलीस चौकी बंद झाल्यामुळे असामाजिक तत्त्वांचे फावत आहे. पोलिसांनी या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
रस्त्यांची अवस्था बिकट
टिमकी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक रस्त्यांवर मधोमध गडरलाइनचे चेंबर असल्यामुळे वाहनचालक वाहन चालविताना खाली पडण्याच्या घटना घडत आहेत. फुटपाथची अवस्थाही खराब झाली आहे. या भागात सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे जागोजागी कचरा पडून राहतो. त्यामुळे महापालिकेने या भागात नियमित सफाई कर्मचारी पाठविण्याची गरज आहे. या भागात गार्डन नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
गडरलाइनची दुरुस्ती करावी
गडरलाइन वारंवार चोकअप होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. गडरलाइनचे घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत असून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
-रवी खापेकर, नागरिक
रस्त्यांची दुरुस्ती महत्त्वाची
रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेकदा वाहनचालक घसरून पडतात. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
-अजय बारापात्रे, नागरिक
फुटपाथची अवस्था खराब
फुटपाथची तुटफूट झाली आहे. फुटपाथचे गट्टू तुटल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी फुटपाथची दुरुस्ती करावी.
-विनोद घोडपागे, नागरिक
सफाई कर्मचारी नियमित यावेत
परिसरात सफाई कर्मचारी नियमित येत नाहीत. त्यामुळे या भागात नेहमीच जागोजागी कचरा साचलेला दिसतो. कचरा साचल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने या भागात नियमित सफाई कर्मचारी पाठविण्याची व्यवस्था करावी.
-गंगाबाई टोपरे, नागरिक
असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा
महापालिकेच्या शाळेत असामाजिक तत्त्व गोळा होतात. तेथे दारू पिणे, जुगार खेळणे, गांजा पिणे, असे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
-अक्षय बहारघरे, नागरिक
गार्डनची व्यवस्था करावी
टिमकी परिसरात गार्डन नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा अपघात होण्याची शक्यता असून महापालिकेने या भागात लहान मुलांना गार्डनची व्यवस्था करण्याची गरज आहे.
-गंगूबाई धकाते, नागरिक
..........