लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्वसननलिकेचा प्रभावित झालेला भाग काढून, रुग्णाचा श्वास सुरू असतानाच श्वसननलिका एकमेकांना जोडण्याची शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची किमया नागपूरच्याडॉक्टरांनी केली. यामुळे त्या रुग्णाला जीवदान मिळाले. श्वसननलिका २ मिलिमीटरपर्यंत अरुंद झाल्याने श्वास घेणे कठीण झाले होते. विशेष म्हणजे, त्याला शस्त्रक्रियेसाठी दिल्लीला जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.
अमरावती येथील एका ३० वर्षीय तरुणाला अपघातामुळे डोक्याला गंभीर इजा झाली. तेथीलच एका रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेदरम्यान व्हेंटिलेटरची नळी घशापर्यंत टाकण्यात आली; परंतु नंतर व्हेंटिलेटरची नळी काढण्यातच आली नाही. फार काळ श्वसननलिकेत नळी राहिल्यामुळे श्वासनलिका आकुंचन पावली व ती तेथेच अडकली. नळी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शक्य झाले नाही. नागपूरच्या क्रिम्स हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी ब्रोंकोस्कोपी केली. श्वसननलिकेला सूज आल्याचे व पस जमा झाल्याचे निदान झाले. तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते; परंतु गुंतागुंतीची व दुर्मीळ शस्त्रक्रियेचा रुग्णाच्या जीवाला धोका होता.
अत्यंत क्लिष्ट व धोकादायक डॉ. अरबट यांनी सांगितले, शल्यचिकित्सक डॉ. गोपाल गुर्जर यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने ही अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी केली. श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. परिमल देशपांडे व डॉ. स्वप्निल बाकमवार यांनी सहकार्य केले.
नागपूर हे मेडिकल हब होत आहे. सर्वच प्रकारच्या गुंतागुंतीच्या व दुर्मीळ शस्त्रक्रिया नागपुरात होऊ लागल्या आहेत. श्वसननलिकेचा एक भाग काढून जोडणे हे अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचे होते. डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ