नरखेड : नरखेड तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जलालखेडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांची दर पाच वर्षात परिवर्तनाची परंपरा याही निवडणुकीत कायम राखली. सत्ताधारी जलालखेडा सुधार समिती विरुद्ध जनक्रांती पॅनेलला मतांचा जोगवा देऊन ९-४ फरकाने सत्ता सोपविली.
तालुक्यात कोणत्याही राजकीय उलथापालथीची सुरुवात जलालखेड्यापासून होते. येथे राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व भाजप या चारही पक्षांची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे १३ सदस्यीय असलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. सर्वच राजकीय पक्ष येथे गटात विखुरले आहेत. त्यामुळे स्थानिक निवडणुकीत सोयीने सर्व पक्षांतील गट एकत्र येऊन निवडणूक लढवितात. गत पंचवार्षिकमध्ये जलालखेडा सुधार समितीकडे सत्ता सोपविली होती. या निवडणुकीत जनक्रांती पॅनेलला ९ जागी विजय मिळाला, तर जलालखेडा सुधार समितीला ४ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चौधरी, गिरीधर वरटकर, मधुकर चौरे, हकीम शहा, अय्युब पठाण, सोनिराम नाडेकर, रमेश वाडकर, शिवसेनेचे किसना शेळके, पिंटू मानकर व भाजपचे पप्पू चौधरी, मयूर दंढारे यांनी एकत्र येऊन जनक्रांती पॅनेल मैदानात उतरविले. काँग्रेसचे दिलीप हिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल पेठे, प्रमोद पेठे व काही भाजपच्या लोकांनी एकत्र येऊन जलालखेडा सुधार समिती मैदानात उतरविली. मतदारांनी निवडणुकीत जनक्रांती पॅनेलला ९ व जलालखेडा सुधार समितीला ४ जागी संधी दिली. जनक्रांती पॅनेलचे विजयी उमेदवार मयूर सोनोने, मयूर दंढारे, रजनी कळंबे, रुबिना मिर्झा, ईश्वर उईके, अधीर चौधरी, सुरेश बारापात्रे, अर्चना लिखार, माधुरी चौरे असे आहेत. जलालखेडा सुधार समितीचे कीर्ती पेठे, रूपाली खडसे, कैलास निकोसे, प्रतिभा कवरे यांनी विजय प्राप्त केला.