शोकांतिका ! नागपुरात २३४ रुग्णांमागे एक खाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 10:47 PM2018-04-06T22:47:54+5:302018-04-06T22:48:07+5:30

शहरात एकीकडे डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लोकसंख्या ३० लाखांवर गेली असलीतरी वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.

Tragedy! A cot behind 234 patients in Nagpur | शोकांतिका ! नागपुरात २३४ रुग्णांमागे एक खाट

शोकांतिका ! नागपुरात २३४ रुग्णांमागे एक खाट

googlenewsNext
ठळक मुद्दे३० लाख लोकसंख्येच्या तुलनेत १२८१५ खाटा आरोग्य सेवा तोकडीजागतिक आरोग्य दिन

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : शहरात एकीकडे डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लोकसंख्या ३० लाखांवर गेली असलीतरी वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. साध्या शासकीय व खासगी रुग्णालयांतील एकूण खाटांचा विचार केला तर शहरात केवळ १२८१५ खाटा उपलब्ध आहेत, यावरून २३४ नागरिकांमागे एक खाट असे प्रमाण आहे. शहरात दुर्दैवाने एखादे नैसर्गिक संकट आले आणि त्यामध्ये १४ हजारावरील नागरिक पीडित झाले तर काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. नागपूर हे ‘मेट्रो’ सिटी होत आहे. यामुळे येथे धन्वंतरीचे पाईक रुग्णसेवेसाठी तत्पर असतील, पण सेवा देणारे कुठे हाच प्रश्न भविष्यात समोर येणार आहे.
२०११ साली २० लाख लोकसंख्या असलेले नागपूर शहर ३० लाख लोकसंख्येच्या पुढे सरकले आहे. शहरात मनपाचे ३७ दवाखाने, १२ हेल्थ पोस्ट व १० माता-बाल संगोपन केंदे्र आहेत. यातील महापालिकेच्या पाचपावली दवाखान्यात १० खाटा, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ८० खाटा तर इमामवाडा येथील आयसोलेशन दवाखान्यात ४० खाटा अशा एकूण १३० रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था आहे. शहरात तीन शासकीय रुग्णालये महत्त्वाची आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) खाटांची संख्या १६०० आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) खाटांची संख्या ६९० आहे, तर डागा रुग्णालयात ३६५ खाटांची सोय आहे. खासगी रुग्णालयांची संख्या ६३३ असून खाटांची संख्या ९८०० आहे, एकूण खाटांची संख्या १२८१५ आहे. परंतु लोकसंख्येचा विचार केल्यास ही संख्या अपुरी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार गेल्या आठ वर्षांत स्वाईन फ्लू, डेंग्यूचे आजार बळावले आहेत. दरवर्षी यात वाढ होताना दिसून येत आहे. इतरही संसर्गजन्य आजार वेळोवेळी डोके वर काढतात, अशावेळी अचानक मोठी आपत्ती ओढवल्यास नागपुरात बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
दोन हजार रुग्णक्षमतेच्या रुग्णालयांची गरज
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाच्या मते, १९८५ च्या तुलनेत सध्या शहराचा विस्तार चारही दिशेने झाला आहे. ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात सुमारे चार लाख नागरिक शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानकातून दररोज ये-जा करतात. शहरात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात साधारण चार ते पाच लाख लोकसंख्या आहे. यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन हजार रुग्णक्षमता असलेल्या रुग्णालयाची गरज आहे. शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांवर नजर टाकल्यास एकाही रुग्णालयात अत्याधुनिक सोयी नाहीत. येथील रुग्णालयाची भिस्त जुन्याच सोर्इंवर आहे. यातच मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे वाढलेले रुग्ण, त्या तुलनेत सोयींचा तुटवडा व कमी मनुष्यबळामुळे गरीब रुग्ण गैरसोयींना तोंड देत असल्याचे चित्र आहे.
आरोग्य संस्था         रुग्णालयाची संख्या                  खाटांची संख्या
मनपा                         ३                                               १३०
मेडिकल                     १                                                १,६००
मेयो                           १                                               ६९०
डागा                          १                                              ३६५
सुपर स्पे. हॉस्पिटल    १                                            २३०
खासगी रुग्णालये     ६३३                                        ९८००

४८ हेल्थ पोस्टची आवश्यक्ता
५० हजार लोकसंख्येमागे एक हेल्थ पोस्ट असावे, असे शासनाचे प्रमाण आहे. महापालिकेचे १२ हेल्थ पोस्ट आहेत. आणखी ४८ हेल्थ पोस्टची शहराला गरज आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज आहे, मात्र शासनाचे अद्यापही याकडे लक्ष नाही.
शासकीय रुग्णालयांचा वापर पूर्ण क्षमतेने होण्याची गरज
नागपुरात कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र आहे, राज्य कामगार रुग्णालय आहे, मनपाचे हॉस्पिटल आहे या सर्वांचा वापर आजही पूर्ण क्षमतेने होत नाही. शासनाने याकडे आताच लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे रोजच्या रुग्णांना मदत तर होईलच मोठी आपत्ती आल्यास याचीही मदत मिळेल.
डॉ. वाय. एस. देशपांडे
अध्यक्ष, आयएमए महाराष्ट्र 

 

Web Title: Tragedy! A cot behind 234 patients in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.