प्रशिक्षणार्थी डॉक्टर अतिरिक्त भत्त्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:16 AM2021-01-13T04:16:24+5:302021-01-13T04:16:24+5:30
कोरोना काळात दिली होती सेवा : १८ जानेवारीला आंदोलनाचा इशारा नागपूर : कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची भूमिका ...
कोरोना काळात दिली होती सेवा : १८ जानेवारीला आंदोलनाचा इशारा
नागपूर : कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची भूमिका महत्त्वची राहिली. शहरातील शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या रुग्णांना सेवा दिली. यात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व (मेयो) रुग्णालयासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सेवा दिली. परंतु या सेवाकार्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना अद्याप अतिरिक्त भत्ता देण्यात आला नाही. यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली आहे. आतापर्यंत अतिरिक्त भत्ता देण्याबाबत शासनाकडून आश्वासनच मिळाले. अशा स्थितीत प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी १८ जानेवारीला आंदोलनाचा इशारा दिला आहे. सूत्रांनुसार, कोरोनाच्या काळात मेयो रुग्णालयात १५० डॉक्टरांनी ओपीडीपासून संक्रमित वॉर्ड आणि कोविड आयसीयत सेवा दिली. मेडिकलमध्ये २०० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी योगदान दिले. मेयो रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनुसार अतिरिक्त भत्त्याच्या मागणीसाठी राज्यस्तरीय आंदोलनात मेयो-मेडिकलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर कोरोनाशी संबंधित काम बंद करून सहभागी होणार आहेत.
..................
उपमुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा
संघटनेने दावा केला आहे की २२ डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना अतिरिक्त भत्ता देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. यापुर्वीही शासनाकडून अशाच प्रकारचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत अतिरिक्त भत्ता देण्यात आला नाही.
............