ठाणेदारांसह २५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:45 PM2020-10-29T23:45:24+5:302020-10-29T23:46:32+5:30
Police Inspectors Transfer नियुक्तीचा कालावधी पूर्ण करणाऱ्या शहर पोलीस दलातील काही ठाणेदारांसह २५ पेक्षा जास्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. यात गुन्हे शाखा आणि लोहमार्ग पोलीस दलाचाही समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नियुक्तीचा कालावधी पूर्ण करणाऱ्या शहर पोलीस दलातील काही ठाणेदारांसह २५ पेक्षा जास्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. यात गुन्हे शाखा आणि लोहमार्ग पोलीस दलाचाही समावेश आहे.
राज्य पोलीस महासंचालनालयातून गुरुवारी राज्यभरात आपला नियुक्तीचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदलीची यादी जाहीर करण्यात आली. यात नागपुरातील एमआयडीसीचे ठाणेदार हेमंत खराबे, अंबाझरीचे ठाणेदार विजय करे, गुन्हे शाखेचे राजेंद्र निकम, संतोष खांडेकर, भानुदास पिदुरकर यांच्यासह २५ पोलीस निरीक्षकांसह शंभरावर सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यातील करे यांची सांगली तर, खराबे आणि निकम यांची नागपूर ग्रामीणला बदली झाली आहे. खांडेकर आणि पिदुरकरांना वर्धा येथे नियुक्ती मिळाली आहे.
आज जाहीर झालेल्या बदलीच्या यादीकडे अनेक महिन्यांपासून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते. काहींनी आपले पॅकिंगही आधीच करून ठेवले होते. मात्र, या ना त्या कारणामुळे बदल्यांच्या आदेशाऐवजी तारीख पे तारीख मिळत होती. अखेर एकदाची आज ही यादी जाहीर झाली. त्यामुळे शहर पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांना आनंदाचे भरते आले आहे. मात्र, अनेकांना मनासारखे ठिकाण न मिळाल्याने त्यांच्यात नाराजीही पसरली आहे.
उपायुक्त साळी अमरावतीला
विशेष म्हणजे, बुधवारी राज्यातील उपायुक्तांसह अन्य काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांचाही समावेश आहे. साळी केवळ दीड वर्षापूर्वीच नागपुरात बदलून आले होते. तर, वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारून त्यांना केवळ चार महिने झाले आहेत.
---