नागपुरात प्रवाशांच्या जीवावर ट्रॅव्हल्स चालकांची दिवाळी : प्रवास भाडे झाले तिप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 11:21 PM2019-10-23T23:21:42+5:302019-10-23T23:22:50+5:30
खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी दिवाळीच्या काळात आपले प्रवासभाडे दुप्पट ते तिप्पट केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड बसत असून त्यांची मोठी लूट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या काळात रेल्वेगाड्या फुल्ल झाल्यामुळे प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. यामुळे अनेक प्रवासी खासगी वाहतुकीच्या साधनांकडे वळले आहेत. परंतु खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी दिवाळीच्या काळात आपले प्रवासभाडे दुप्पट ते तिप्पट केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड बसत असून त्यांची मोठी लूट होत आहे.
दिवाळीचा सण अनेकजण कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचे प्लॉनींग करतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात अनेकजणांना प्रवास करण्याची पाळी येते. प्रवासाचे स्वस्त माध्यम म्हणून प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु दिवाळीच्या काळातील सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे. त्यामुळे प्रवासी खासगी वाहतूकदारांकडे वळत आहेत. परंतु दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी आपले दर तिप्पट केले आहेत. एसटी बसेसच्या प्रवास भाड्यापेक्षा ५० टक्के अधिक रक्कम प्रवाशांकडून आकारण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव तिप्पट पैसे मोजून प्रवास करण्याची पाळी येत आहे. अनेक शहरात एकाच बाजूने प्रवासी मिळत असून परतीच्या प्रवासात बसेसमध्ये प्रवासी राहत नसल्यामुळे भाडे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी सांगितले. दिवाळीच्या काळात आठ दिवस ट्रॅव्हल्सचे प्रवास भाडे वाढलेले राहणार असून दिवाळी आटोपल्यानंतर नियमितपणे भाडे वसूल करण्यात येणार असल्याची माहिती ट्रॅव्हल्स संचालकांनी दिली.
एरवीचे भाडे दिवाळीतील भाडे
नांदेड ६०० १०००
नाशिक १२०० २५००
पुणे १००० २५०० ते २८००
हैदराबाद ९०० १४०० ते १८५०
औरंगाबाद ७०० १२०० ते १५००
सोलापूर ९०० १००० ते १२००
सुरत ११०० १४०० ते १८००
एकाच बाजूने मिळतात प्रवासी
‘नागपूर ते पुणे प्रवासात प्रवासी मिळत नसल्यामुळे प्रवास भाडे केवळ १ हजार रुपये आहे. परंतु पुणे-नागपूरसाठी २५०० ते २८०० रुपये आकारण्यात येत आहेत. वर्षभर आम्ही प्रवाशांना स्वस्त दरात प्रवासाची सुविधा देतो. परंतु दिवाळीच्या काळातील भाडे वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागतो. दिवाळी आटोपल्यानंतर नियमित भाडे वसूल करण्यात येईल.’
महेंद्र लुले, कोषाध्यक्ष, ट्रॅव्हल्स असोसिएशन नागपूर