आजपासून थांबणार इतवारी-नागभीड नॅरोगेजचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:45 AM2019-11-24T00:45:02+5:302019-11-24T00:46:22+5:30
इतवारी-नागभीड नॅरोगेज रेल्वेचा प्रवास रविवारपासून कायमचा थांबणार आहे. नागपूर विभागातील एकमेव नॅरोगेज रेल्वे बंद होणार असल्यामुळे यापुढे प्रवाशांसोबत नॅरोगेजच्या केवळ आठवणी उरणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारी-नागभीड नॅरोगेज रेल्वेचा प्रवास रविवारपासून कायमचा थांबणार आहे. नागपूर विभागातील एकमेव नॅरोगेज रेल्वे बंद होणार असल्यामुळे यापुढे प्रवाशांसोबत नॅरोगेजच्या केवळ आठवणी उरणार आहेत. त्यानंतर १ डिसेंबरपासून नागभीड ब्रॉडगेज रेल्वेच्या कामाला सुरुवात होणार आहे.
भारतीय रेल्वेत नॅरोगेजचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये होत आहे. नागपूर विभागात केवळ इतवारी-नागभीड हा एकमेव मार्ग शिल्लक होता. या मार्गावरील नॅरोगेज गाडीही बंद होणार आहे. नॅरोगेजच्या प्रवासाला उशीर लागत असला तरी या प्रवासाचा आनंद वेगळाच होता. यापुढे हा आनंद प्रवाशांना घेता येणार नाही. या मार्गावर १९१३ पासून नॅरोगेज रेल्वेगाडी धावते. या मार्गावरील वाहतुकीमुळे चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी १९९७ पासून प्रयत्न सुरू झाले. १९९७ साली या मार्गासाठी पहिल्यांदा सर्वेक्षण झाले होते. त्यावेळी यासाठी १४२ कोटी रुपये खर्च येणार होता. २००९ साली जुने सर्वेक्षण अपडेट करण्यात आले. त्यानंतर २०१२ मध्ये पुन्हा सर्वेक्षण झाले. त्यानंतर २०१३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाची घोषणा करण्यात आली आणि त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूदही तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी केली होती. १०६ किमी मार्गाच्या विस्तारासाठी ९२२ कोटी रुपये खर्च येणार आहे. यात राज्य सरकार ५० टक्के वाटा उचलणार आहे.
या गाड्या होणार बंद
नागपूर-नागभीड या मार्गाचे तीन टप्प्यात काम होणार असून, पहिल्या टप्प्यात नागभीड-भिवापूर, दुसऱ्या टप्प्यात भिवापूर-उमरेड आणि तिसऱ्या टप्प्यात उमरेड-नागपूर असे काम विद्युतीकरणासह होणार आहे. त्यामुळे गाडी क्रमांक ५८८४३/५८८४४ इतवारी-नागभीड-इतवारी, ५८८४५/५८८४६ इतवारी-नागभीड-इतवारी, ५८८४७/५८८४८ इतवारी-नागभीड-इतवारी आणि ५८८७७/५८८७८ इतवारी-नागभीड-इतवारी या गाड्या कायमच्या बंद होणार आहेत.