पेंच जलाशयाचा उपकालवा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:08 AM2021-02-08T04:08:57+5:302021-02-08T04:08:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यातून पेंच प्रकल्पाचा डावा कालवा गेला आहे. या कालव्याचा उपकालवा नांदगाव (ता. माैदा) ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तालुक्यातून पेंच प्रकल्पाचा डावा कालवा गेला आहे. या कालव्याचा उपकालवा नांदगाव (ता. माैदा) शिवारात फुटल्याने त्यातील पाणी लगतच्या शेतात शिरले. त्यामुळे शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून, पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. हा उपकालवा शनिवारी (दि. ६) मध्यरात्री फुटला असून, रविवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आला.
हा उपकालवा पेंच प्रकल्पाच्या डाव्या मुख्य कालव्याला खापरखेडा (ता. माैदा) शिवारात जाेडला असून, ताे मुख्य कालवा पुढे भंडारा जिल्ह्यात गेला आहे. खापरखेडा शिवारातून निघालेला उपकालवा पुढे नांदगाव शिवारातून सुकळी, मुरमाडी, काचूरवाही, इंदाेरा (ता. माैदा) शिवाराच्या दिशेने गेला आहे. संपूर्ण माैदा तालुक्यात सिंचनाच्या प्रभावी सुविधा नसल्याने, बहुतांश शेतकरी ओलितासाठी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असतात. त्यामुळे रब्बी हंगामात या कालव्यात पाणी साेडले जात असल्याने, उपकालवे व चऱ्यांमध्येही पाणी असते.
दरम्यान, नांदगाव शिवारातील किशाेर काठाेके यांच्या शेताजवळ या उपकालव्याच्या भिंतीला भगदाड पडले आणि त्यातील पाणी किशाेर काठाेके, प्रकाश काठोके, ताराचंद काठोके व अशोक काठोके सर्व रा.नांदगाव, ता.मौदा यांच्या शेतात शिरल्याने त्यांच्या शेताला सकाळी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले हाेते. ही बाब रविवारी सकाळी लक्षात येताच, शेतकऱ्यांनी पेंच पाटबंधारे विभागाचे वकरेकर यांना फाेनवरून माहिती दिली.
आपण कर्मचाऱ्यांना उपकालव्याची लेव्हल वाढविण्याची सूचना दिल्याची माहिती वकरेकर यांनी दिली. दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्य याेगेश देशमुख यांनीही सकाळी फुटलेला उपकालवा आणि शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सायंकाळपर्यंत शेतातील पाणी ओसरले हाेते. दुपारच्या सुमारास पेंच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व नुकसानीचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याेग्य नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषद याेगेश देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिली.
....
पिकांचे नुकसान
या वर्षी या भागातील बहुतांश शेतकऱ्यांना तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे धानाचे समाधानकारक उत्पादन झाले नाही. त्यामुळे किशाेर काठाेके, प्रकाश काठोके, ताराचंद काठोके व अशोक काठोके या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील मिरचीच्या पिकावर लक्ष केंद्रित केले हाेते. त्यांनी काही भागांत मिरचीची लागवड तर काही भागांत गव्हाची पेरणी केली आहे. शेतात उपकालव्यातील पाणी माेठ्या प्रमाणात शिरल्याने, त्यांच्या शेतातील मिरची व गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
...
पाण्याचा प्रवाह सुरूच
या उपकालव्याच्या दुरुस्तीचे काम दाेन महिन्यांपासून सुरू आहे. त्यातच खरडा (ता.माैदा) शिवारात या उपकालव्याचे पाणी पाेहाेचत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून, त्यांनी याबाबत पेंच पाटबंधारे विभागाकडे तक्रार केल्याचे सांगितले. उपकालव्याची भिंत फुटल्यानंतरही त्यातील पाण्याचा प्रवाह पूर्णपणे बंद केला नव्हता. प्रवाह बंद करण्याऐवजी पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या उपकालव्याच्या भिंतींना आतून सिमेंटचे अस्तरीकरण केलेले नाही.