लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रू जेट एअरलाईन्सकडे विमाने उपलब्ध नसल्यामुळे जुलैमध्ये नागपुरातून अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांमध्ये सुरू होणारी विमान सेवा आता रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर विमान सेवा ऑगस्टपासून सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. पण कंपनीने दुसरी तारीख न दिल्यामुळे ही विमान सेवा आता सुरू होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.केंद्र सरकारने छोट्या शहरांना विमान सेवेने जोडण्यासाठी ‘उडान’ (उडे देश का आम नागरिक) योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत वेगवेगळ्या विमान कंपन्यांना वेगवेगळ्या मार्गाचे वाटप करण्यात आले आहे. ट्रू जेट एअरलाईन्सने नागपूर, हैदराबाद, नांदेड, औरंगाबाद, नाशिक, मुंबई आणि अहमदाबाद हे मार्ग निवडले होते. यातील नागपुरातून अहमदाबाद आणि हैदराबाद मार्गावर जुलै महिन्यात विमान सेवा सुरू करण्याचे जाहीर केले होते. परंतु या मार्गावर सेवा सुरू झाली नाही, पण उर्वरित मार्गावर सेवा सुरू आहे.नागपूर ते अहमदाबासाठी ७२ सिटचे एटीआर-७२ हे विमान कंपनी वापरणार होते. दोन इंजिन असलेले विमान फ्रान्स आणि इटलीच्या कंपन्यांनी तयार केले आहे. परंत त्यांनी ट्रू जेटला विमान अजूनही दिलेले नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही विमान सेवा सुरू होण्याची शक्यता नाही. पावसाळ्यात हैदराबाद मार्र्गावर फारसे प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे नागपूर-अहमदाबाद सेवा सुरू केल्यास कंपनीला फायदा होण्याची अपेक्षा होती. त्यामुळे कंपनीने प्रारंभी नागपूर-अहमदाबाद मार्गाची निवड केली होती. मिहान इंडिया लिमिटेडने ट्रू जेटला वेळेचे (स्लॉट) वाटप केले होते.स्पाईस जेटची नागपुरातून सप्टेंबरमध्ये विमान सेवास्पाईस जेट एअरलाईन्स आता नागपुरातून मुंबई आणि दिल्लीसह देशाच्या काही शहरांमध्ये विमान सेवा सुरू करण्यास इच्छुक आहे. मिहान इंडिया लिमिटेडकडे कंपनीने अजूनही लेखी कळविले नाही. पण वेळेच्या (स्लॉट) वाटपासाठी सप्टेंबरमध्ये नागरी उड्ड्यण संचालनालय, नवी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत सत्यस्थिती कळून येणार आहे. दोन वर्षांपूर्वी एअर इंडियाच्या एमआरओच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या सीईओंना नागपुरातून विमान सेवा करण्याचा आग्रह केला होता. त्यावेळी त्यांनी होकार देत नागपुरातून विमान सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दोन वर्षांनंतर नागपुरातून स्पाईस जेटची विमान सेवा सुरू होण्याचे संकेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.ट्रू जेटने दुसरी तारीख दिलेली नाहीकंपनीने जुलैमध्ये विमान सेवा का सुरू केली नाही, याचे कारण सांगता येणार नाही. कंपनीने विमान सेवेसाठी दुसरी तारीख दिलेली नाही. त्यामुळे ट्रू जेटची विमान सेवा सध्या तरी सुरू होणार नाही. विमान सेवेची तारीख निश्चित झाली तेव्हा एमआयएलने एअरलाईन्सला सेवेसाठी वेळेचे (स्लॉट) वाटप केले होते.विजय मुळेकर, वरिष्ठ विमानतळ संचालक,मिहान इंडिया लिमिटेड.
ट्रू जेट एअरलाईन्सला विमान सेवा सुरू करण्यात अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:42 PM
ट्रू जेट एअरलाईन्सकडे विमाने उपलब्ध नसल्यामुळे जुलैमध्ये नागपुरातून अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांमध्ये सुरू होणारी विमान सेवा आता रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर विमान सेवा ऑगस्टपासून सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. पण कंपनीने दुसरी तारीख न दिल्यामुळे ही विमान सेवा आता सुरू होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठळक मुद्देपुढील तारीख निश्चित नाही : स्पाईस जेट विमान सेवा सुरू करणार