‘आयटी’ इंजिनिअरला ‘ट्विटर’मुळे मिळाली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 08:11 PM2019-08-19T20:11:36+5:302019-08-19T20:15:25+5:30
रेल्वेगाडीतच प्रकृती खराब झाल्यामुळे औषधांची नितांत आवश्यकता असताना ‘ट्विटर’वर केलेल्या विनंतीची मध्य रेल्वेने तत्काळ दखल घेतली. पहाटेच्या सुमारास थांबा नसलेल्या स्थानकावर गाडी थांबवून रेल्वे कर्मचाऱ्यांनी आवश्यक औषधे पोहोचविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही काळापासून ‘ट्विटर’च्या माध्यमातून भारतीय रेल्वे प्रशासन जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील एका ‘आयटी’ इंजिनिअर दाम्पत्यालादेखील याचा अनुभव आला. रेल्वेगाडीतच प्रकृती खराब झाल्यामुळे औषधांची नितांत आवश्यकता असताना ‘ट्विटर’वर केलेल्या विनंतीची मध्य रेल्वेने तत्काळ दखल घेतली. पहाटेच्या सुमारास थांबा नसलेल्या स्थानकावर गाडी थांबवून रेल्वे कर्मचाऱ्यांनी आवश्यक औषधे पोहोचविली.
पिंपरी चिंचवड येथील रहिवासी सूरज रायबागकर व त्यांची पत्नी सोनाली रायबागकर हे अजनी स्थानकाहून पुण्याकडे जाण्यासाठी २२१४०-हमसफर एक्स्प्रेसने निघाले. मध्यरात्रीनंतर सोनाली यांची प्रकृती अचानक खराब झाली व त्यांना प्रचंड तापदेखील चढला. अशा स्थितीत सूरज यांनी रेल्वेत औषधे आहेत का किंवा काही वैद्यकीय मदत मिळेल का याची चौकशी केली. बहुतांश लोक गाढ झोपेत असल्याने मदत मिळाली नाही. अखेर मनमाड स्टेशन गेल्यानंतर सूरज यांनी रेल्वेच्या ‘ट्विटर’वर आपली समस्या मांडली व कमीत कमी औषधे उपलब्ध करून देण्याची विनंती केली. सूरज यांना फारशी अपेक्षा नव्हती. परंतु मध्य रेल्वेकडून तत्काळ त्यांच्या ‘ट्विटर’वर उत्तर देण्यात आले व त्यांचा मोबाईल क्रमांक तसेच बर्थ-कोच क्रमांक मागण्यात आला. मनमाडनंतर हमसफर एक्स्प्रेसचा थांबा थेट दौंड स्थानकावर असतो. मात्र मध्य रेल्वेने वैद्यकीय मदत पोहोचविण्याकरिता थांबा नसलेल्या कोपरगाव स्थानकावर गाडी थांबवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी औषधे पोहोचविली तसेच वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात नेण्याचीदेखील तयारी दाखविली. वेळेवर औषधे पोहोचल्याने रायबागकर दाम्पत्याला आश्चर्याचा धक्काच बसला होता. विशेष म्हणजे आवश्यक मदत पोहोचली की नाही याची ‘कंट्रोल रुम’कडून विचारणा करण्यात आली व त्यानंतरच रेल्वे पुढील प्रवासाला रवाना झाली. रेल्वेकडून ‘ट्विटर’च्या माध्यमातून प्रवाशांना मदत करण्यात येते असे केवळ ऐकलेच होते. प्रत्यक्षात इतकी तत्परता दाखविण्यात येत असेल असा अंदाजदेखील नव्हता. रेल्वेतर्फे प्रवाशांच्या हितासाठी खरोखरच चांगला पुढाकार घेण्यात येत आहे, या शब्दांत सूरज रायबागकर यांनी आपली भावना व्यक्त केली.