नागपुरात धुलिवंदनात रंग व गुलालाची दोन कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:08 AM2018-03-01T00:08:30+5:302018-03-01T00:08:50+5:30
इतवारी, रेशीमओळ या विदर्भाच्या मुख्य बाजारपेठेतून गेल्या काही वर्षांपासून धुलिवंदनात लाल आणि हिरव्या रासायनिक रंगाऐवजी विविधरंगी गुलाल आणि हर्बल रंगाची जास्त विक्री होते. यावर्षी रंग आणि गुलालाची दोन कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारी, रेशीमओळ या विदर्भाच्या मुख्य बाजारपेठेतून गेल्या काही वर्षांपासून धुलिवंदनात लाल आणि हिरव्या रासायनिक रंगाऐवजी विविधरंगी गुलाल आणि हर्बल रंगाची जास्त विक्री होते. यावर्षी रंग आणि गुलालाची दोन कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
३० टन रंगाची विक्री
होळीदरम्यान गुजरात आणि मुंबईहून उच्च दर्जाचे रंग रेशीमओळ येथील ठोक व्यापाऱ्यांकडे येतात. त्यांच्याकडून किरकोळ व्यापारी रंगाची खरेदी करतात. या रंगामध्ये भेसळ करून हलक्या दर्जाचे रंग बाजारात विक्रीसाठी आणतात. गुजरात आणि मुंबईहून १० टन रंग येत असेल तर किरकोळ व्यापारी या रंगापासून ३० टन हलका माल तयार करतात. गेल्या काही दिवसांपासून रोडामॅन या उच्च दर्जाच्या लाल रंगाचे भाव दुपटीवर अर्थात हजार रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. चीन येथून कच्चा माल काही दिवसांपासून फारच कमी येत आहे. रोडामॅनचा ८० टक्के उपयोग लाल गुलाल तयार करण्यासाठी होतो. विविध रंगातील गुलाल २५ किलोच्या बॅगमध्ये १२०० ते १३०० रुपये किलो अर्थात ५० ते ६० रुपये किलो या भावात विक्रीस आहेत. उच्च दर्जाचे रंग आणि नागपुरी गुलालाची विक्री मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात होते. एकूण ५० ते ६० लाख रुपये किमतीचा गुलाल विकला जातो. नागपुरात रंग आणि गुलालाची विक्री २ कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती रेशीमओळ येथील ठक्कर ब्रदर्सचे संचालक प्रकाशभाई ठक्कर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
नागपुरात गुलाल व हर्बल रंगांना पसंती
रासायनिक रंग त्वचेसाठी घातक असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नागपुरातील सजग नागरिक गडद हिरवा आणि लाल रंगाऐवजी गुलाल आणि हर्बल रंगांना जास्त पसंती देतात. महिला आणि वयस्कांना हर्बल रंग जास्त आवडतो. हर्बल रंगाची विक्री लाखांच्या घरात गेली आहे. हा रंग आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात उपलब्ध असल्याचे प्रकाशभाई यांनी सांगितले.
चीन मोठी बाजारपेठ
सर्वत्र वापरला जाणारा रोडामॅन या लाल रंगाच्या निर्मितीसाठी सर्वाधिक कच्चा माल चीनमधून गुजरात आणि मुंबईत येतो. काही वर्षांपासून तर चीन पक्का रोडामॅन भारतात पाठवित आहे. या रासायनिक रंगाची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. कापड उद्योगात या रंगाचा जास्त उपयोग होतो. हा रंग महाग असल्यामुळे होळीदरम्यान नागपुरात या रंगाची विक्री सव्वा कोटीच्या आसपास होते.