वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने ३० लाखांची खंडणी उकळली; दोन दलाल गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 10:49 AM2022-02-15T10:49:13+5:302022-02-15T10:51:53+5:30
पोलिसांशी ओळख असलेल्या दलाल वृत्तीच्या व्यक्तींना हाताशी धरून ते अडचणीत आलेल्या व्यापाऱ्यांना अशाप्रकारे अनेक वर्षांपासून ब्लॅकमेल करत आहेत आणि लाखोंची खंडणी उकळत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच न्यायालयात सेटिंग करून देतो, असे सांगून एका सुपारी व्यापाऱ्याकडून दोन वजनदार दलालांनी तीस लाखांची खंडणी उकळली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आज दोन आरोपींना अटक करण्यात आली.
मनोज आणि अशोक वंजानी अशी त्यांची नावे असून, हे दोघे मांडवलीबाज म्हणून कुख्यात आहेत. पोलिसांशी ओळख असलेल्या दलाल वृत्तीच्या व्यक्तींना हाताशी धरून ते अडचणीत आलेल्या व्यापाऱ्यांना अशाप्रकारे अनेक वर्षांपासून ब्लॅकमेल करत आहेत आणि लाखोंची खंडणी उकळत आहेत.
काही दिवसांपूर्वी सुपारी व्यापारी अनुप महेशचंद्र नगरिया यांना पोलिसांनीअटक केली होती. ते कारागृहात पोहोचल्यानंतर आरोपी मनोज वंजानी आणि अशोक वंजानी यांनी अनुप नगरिया यांचे बंधू अनिल यांना, “आता तुझा भाऊ कारागृहातून कधीच बाहेर येणार नाही. त्याला बाहेर काढायचे असेल तर साठ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायालयातील काही मंडळींना ही खंडणी पोहोचवून त्यांच्या माध्यमातून तुझ्या भावाला बाहेर काढू”, असे आरोपी म्हणाले. तशी फोनवरून काही कथित अधिकाऱ्यांशी बोलणीही करून दिली.
दरम्यान, ६० लाखांपैकी ३० लाख रुपये उकळल्यानंतर उर्वरित ३० लाख रुपये मिळावे म्हणून आरोपींनी नगरिया बंधूंना वेठीस धरले. त्यांचा त्रास प्रचंड वाढल्याने नगरिया यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. आपल्या नावाने खंडणी वसूल केली जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली. आरोपी वंजानी बंधूंविरुद्ध तहसील ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
वंजानीसोबत दलालांची मोठी टोळी
अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांशी सेटिंग करून देतो म्हणून लाख रुपये उकळणाऱ्या आरोपी वंजानी बंधूंची चौकशी केल्यास, त्यांचे कॉल डिटेल्स काढल्यास धक्कादायक खुलासे होऊ शकतात.