युद्धातील दोन रणगाडे कस्तूरचंद पार्कवर ठेवणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 10:03 PM2019-11-06T22:03:41+5:302019-11-06T22:05:06+5:30

भारत-पाकिस्तान आणि भारत-चीनमधील युद्धात भारतीय सेनेने वापरलेले दोन विजयंता नामक रणगाडे कस्तूरचंद पार्क येथे ठेवण्यात येणार आहे.

Two battlefields tank will be kept at Kasturchand Park! | युद्धातील दोन रणगाडे कस्तूरचंद पार्कवर ठेवणार !

युद्धातील दोन रणगाडे कस्तूरचंद पार्कवर ठेवणार !

Next
ठळक मुद्देसेनेद्वारे आलेल्या प्रस्तावाला हेरिटेज समितीची मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत-पाकिस्तान आणि भारत-चीनमधील युद्धात भारतीय सेनेने वापरलेले दोन विजयंता नामक रणगाडे कस्तूरचंद पार्क येथे ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया या सेनेच्या मुख्यालयामार्फत आलेल्या प्रस्तावाला बुधवारी हेरिटेज समितीने मंजुरी दिली.
महापालिका मुख्यालायत डॉ.तपन चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली हेरिटेज समितीची बैठक पार पडली. यात रणगाड्यासंदर्भातील प्रस्ताव चर्चेला आला होता. समितीने या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली. यावेळी समितीचे सदस्य आणि मनपाचे उपायुक्त राजेश मोहिते, समिती सदस्य सचिव व नगररचना विभागाचे सहायक संचालक (प्रभारी) सुनील दहिकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक सुप्रिया थूल, डॉ. शुभा जोहरी, उज्ज्वला चक्रदेव, प्रसिद्ध वास्तुविशारद अशोक मोखा, उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया सेना मुख्यालयाचे कर्नल राकेश कुमार आदी उपस्थित होते.
भारतीय सेनेच्या उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरियाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. सेनेमार्फत भारतीय युद्धात वापरण्यात आलेले विजयंता नावाचे दोन रणगाडे कस्तूरचंद पार्क येथे विद्यार्थी व पर्यटकांसाठी ठेवण्याबाबतचा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावाला हेरिटेज समितीने मंजुरी दिली. या रणगाड्याची देखभाल व दुरुस्ती सेनेद्वारे करण्यात येणार आहे. हे रणगाडे दिल्लीवरून नागपुरात दाखल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी कस्तूरचंद पार्क येथे उत्खननात चार तोफा सापडल्या होत्या. त्या तोफांना पर्यटनासाठी कस्तूरचंद पार्क येथे ठेवण्यात यावे, यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पत्र पाठविण्यात यावे, असा प्रस्ताव अशोक मोखा यांनी मांडला. याला समितीने मंजुरी दिली..
नागपूर मेट्रो रेल्वेमार्फत झिरो माईल येथे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव समितीला सादर करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बैठकीमध्ये मेट्रोद्वारे सादरीकरण करण्यात आले. प्रस्तावामध्ये काही त्रुटी असल्याने सुधारित प्रस्ताव पुढील बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा, असे निर्देश समितीने दिले.

Web Title: Two battlefields tank will be kept at Kasturchand Park!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.