नागपूर : उपराजधानीत रविवारी दोन दुर्दैवी घटनांमध्ये दोन मुलांना नाहक जीव गमवावा लागला. कुटुंबिय घरी असताना दोन्ही घटना घडल्यामुळे जास्त हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एका मुलाचा मृत्यू अंगावर गरम पाणी पडल्याने झाला तर १३ वर्षीय मुलाला खेळताना गळफास लागला.
शांतनू राजेंद्र भोकार रा. कापसी हा मुलगा ८ जानेवारी रोजी सकाळी खेळत होता. त्याचे संतुलन बिघडल्याने तो गरम पाण्याच्या भांड्यावर पडला. गरम पाणी अंगावर पडल्याने तो गंभीरपणे भाजला गेला. त्याला लगेच मेडिकलमध्ये भर्ती करण्यात आले. रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दुसरी घटना खरबी येथे घडली. १३ वर्षीय कार्तिक संतोष वाणी हा ७ जानेवारी रोजी नंदनवन येथील धन्वंतरीनगरात आपल्या आत्याच्या घरी आला होता. त्याच्या आत्याचे घर दोन मजली आहे. खालून काही वस्तू घेण्यासाठी पहिल्या माळ्यावर दोरी व बास्केट बांधलेली आहे. ७ जानेवारी रोजी दुपारी कार्तिक ती दोरी गळ्याला लपेटून खेळत होता. त्या दोरीचा फास गळ्याला आवळल्याने त्याचा श्वास कोंडला गेला. घरच्यांना कुणालाच हा प्रकार लक्षात आला नाही. जेव्हा कार्तिककडे लक्ष गेले तेव्हा त्यांनी त्याला लगेच मेयोमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला.