नागपूर : कोराडी औष्णिक वीज केंद्राचा खसाळा येथील राख बंधारा फुटल्याप्रकरणी महाजेनकोने कारवाई करीत दोन अभियंत्यांना निलंबित केले आहे. यात कंपनीचे स्थापत्य विभागाचे अधीक्षक अभियंता शिरीष वाठ व ऐश हँडलिंग प्लांटचे कार्यकारी अभियंता प्रवीण मडावी यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे महाजेनकोत खळबळ उडाली आहे.
गेल्या १६ जुलै रोजी पावसादरम्यान कोराडी औष्णिक वीज केंद्राचा खसाळा येथील राखेचा बंधारा फुटला. शेकडो हेक्टर शेती राखमिश्रित पाण्यात बुडाली. खसाळा, मसाळा, खैरी गाव सर्वाधिक प्रभावित झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करीत वीज केंद्राची बँक गॅरंटी जप्त केली. तसेच राखेचे योग्य निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासनानेसुद्धा कडक भूमिका घेतली. ‘लोकमत’नेसुद्धा प्रत्यक्षरीत्या प्रभावित स्थळी भेट देऊन बांध फुटल्याचा परिणाम आणि महाजेनकोद्वारे झालेला निष्काळजीपणा उघडकीस आणला होता. अखेर महाजेनकोने तीनसदस्यीय चौकशी समिती स्थापन करून चौकशी सुुरू केली होती.
महाजेनकोच्या स्थापत्य विभागाचे सल्लागार डी. बी. खोब्रागडे, मुख्य अभियंता सी. आर. होळंबे आणि खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांच्या समितीने आपल्या प्राथमिक अहवालात राखेचा बंधारा फुटण्यासाठी या दोन अभियंत्यांना जबाबदार ठरविले आहे. बंधाऱ्याच्या उंचीच्या कार्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या वाठ यांना बंधाऱ्याचे काम वेळेवर पूर्ण न करणे, निष्काळजीपणा आणि मडावी यांना योग्य समन्वय न ठेवल्याबाबत दोषी धरण्यात आले आहे. या आधारावर कंपनीचे कार्यकारी संचालक व्ही. एस. खटारे यांनी दोघांना निलंबित केले आहे.
एक अधिकारी, चार प्रभाग
चौकशी समितीच्या चौकशीत अशीही बाब निदर्शनास आली की, महाजेनकोने शिरीष वाठ यांच्याकडे चार पदांची जबाबदारी सोपवली होती. ते महाजेनकोचा स्थापत्य विभाग (सिव्हिल) चे अधीक्षक अभियंता या पदावर कार्यरत होते; परंतु महाजेनकोने त्यांना उपमुख्य अभियंता (सिव्हिल)सह सिव्हिल सर्कल व ओ. ॲण्ड एम.च्या अधीक्षक अभियंत्याचीही जबाबदारी दिलेली होती. सूत्रांनुसार, काही विशिष्ट लोकांनाच लाभ पोहोचविण्यासाठी महाजेनको व्यवस्थापनाने एकाच व्यक्तीकडे सर्व जबाबदारी दिलेली होती.