खाद्यान्न तपासणीच्या कामासाठी दोन प्रयोगशाळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:30 AM2020-06-10T10:30:48+5:302020-06-10T10:33:41+5:30
खाद्यपदार्थ आणि औषधांच्या नमुन्यांच्या तपासणीचे काम शासकीय प्रयोगशाळेला देणाऱ्या एफडीएतर्फे नवीन प्रयोगशाळा आणि कार्यालयासाठी इमारत बांधण्यात येत आहे.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खाद्यपदार्थांच्या तपासणीसाठी शासकीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेसह दोन वर्षांपासून अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाची प्रयोगशाळा सुरू आहे. एकाच कामासाठी राज्य शासनाच्या दोन प्रयोगशाळा कशाला, हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.
नासुप्र कार्यालयाच्या बाजूला सरकारी प्रयोगशाळेची तीनमजली इमारत तयार आहे. त्यातील अनेक खोल्या रिक्त आहेत. केमिस्ट व तंत्रज्ञासह सध्या पाच कर्मचारी कार्यरत आहेत. खाद्यपदार्थ आणि औषधांच्या नमुन्यांच्या तपासणीचे काम शासकीय प्रयोगशाळेला देणाऱ्या एफडीएतर्फे नवीन प्रयोगशाळा आणि कार्यालयासाठी इमारत बांधण्यात येत आहे. सध्या एफडीएची प्रयोगशाळा आणि कार्यालय भाडेतत्त्वावर आहे. कार्यालय लहान असल्याने फायली योग्यरीत्या ठेवता येत नाहीत.
सिव्हिल लाईन्समध्ये मेट्रो कार्यालयाजवळ एफडीएच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सध्या काम बंद आहे. यादरम्यान एफडीएचे कार्यालय आणि प्रयोगशाळेचे भाडे देण्यात येत आहे. एफडीएच्या कर्मचाऱ्यांना नमुने घेऊन शासकीय प्रयोगशाळेत जावे लागते. एफडीए आणि शासकीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत जवळपास अर्धेच कर्मचारी आहेत. या दोन्ही प्रयोगशाळेतील कर्मचारी एकत्रित केल्यास संख्या पूर्ण होईल. कर्मचाऱ्यांची स्वीकृत संख्या ३२ असून त्यापैकी १५ कर्मचारीच आहेत. कोविड-१९ करिता कार्यालय प्रमुख आणि अन्य कर्मचाऱ्यांना दुसऱ्या जागेची जबाबदारी दिल्याने येथे दररोज ५ कर्मचारी असतात. एफडीए प्रयोगशाळेची हीच स्थिती आहे.
मार्चमध्ये केवळ २४ नमुने
लॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यात एफडीएने शासकीय प्रयोगशाळेला २४ नमुने पाठविले. या महिन्यात सर्वाधिक नमुने पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. पण दोन वर्षांत एफडीएतर्फे कमी नमुने येतात. लॉकडाऊनमध्ये खाद्यपदार्थांची वाढती मागणी आणि भेसळीच्या तक्रारीनंतरही कारवाई कमीच झाली. याकरिता कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची कारणे एफडीएतर्फे दिली जातात. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि कमी कारवाई होत असतानाही एफडीएला पाच माळ्यांच्या इमारतीची गरज काय, असा सवाल आहे.
काम केव्हा पूर्ण होणार, हे सांगणे कठीण
एफडीएचे कार्यालय आणि प्रयोगशाळा भाडेत्तत्वावर आहे. मोठी जागा हवी आहे. नवीन कार्यालयासह प्रयोगशाळेसाठी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम केव्हा पूर्ण होणार, हे सांगता येणार नाही.
-चंद्रकांत पवार, सहआयुक्त (अन्न), एफडीए.