लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीजबिल थकबाकीमुळे विद्युत विभागाकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू आहे. दुसरीकडे नियमित बिल भरणाऱ्या ग्रामीण भागातील ग्राहकांना भरमसाट बिल पाठविण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
मारोती मस्के यांचे मारोडी (ता. मौदा) येथे वडिलोपार्जित कौलारू घर आहे. मस्के कुटुंबीय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या राहत्या घरी दोन लाइट आणि एक पंखा एवढीच विद्युत उपकरणे आहेत. असे असतानाही त्यांना एक महिन्याचे वीजबिल १८ हजार रुपये आले आहे. हे बिल चुकीचे असल्याने त्यांनी बोरगाव (ता. मौदा) येथील महावितरण कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या. मात्र कुणीही त्यांची दखल घेतली नाही. आपण नियमित बिल भरत असतानासुद्धा एवढ्या मोठ्या रकमेचे बिल का देण्यात आले, असा प्रश्न कुटुंबातील सदस्यांना पडला आहे.
महावितरणच्या वतीने ग्रामीण भागात घरगुती मीटरचे रिडिंग योग्य प्रकारे आणि दर महिन्याला घेतले जात नसल्यामुळे ग्राहकांना अंदाजे वीजबिल पाठविले जात असल्याचा आरोप मारोडीचे सरपंच नीलकंठ भोयर यांनी केला आहे. त्यांनी मस्के यांचे वीजबिल कमी करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सहायक अभियंता अविनाश तांडेकर यांना विचारणा केली असता या प्रकरणात लक्ष घालतो, असे सांगितले.