लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुरेशा उपाययोजना न करता उपचाराच्या नावाखाली रुग्णांच्या जिवाचा खेळ मांडणाऱ्या वाडी येथील वेलट्रिट हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध मंगळवारी आणखी दोघांनी तक्रारी नोंदविल्या. मृत रुग्णांच्या नातेवाइकांनी केलेल्या या तक्रारीचे बयाण पोलिसांनी आज नोंदवून घेतले. भीषण अग्निकांड आणि त्यात एका महिलेसह गेलेला चाैघांचा बळी यामुळे वाडीचे वेलट्रीट हॉस्पिटल प्रशासन पुन्हा एकदा चर्चेला आले आहे.
या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत येणाऱ्या वेलट्रीट हॉस्पिटलमध्ये ९ एप्रिलच्या रात्री भीषण आग लागल्यामुळे तुळशीराम सापकन पारधी (गोरेवाडा), शिवशक्ती भगवान सोनबरसे (चंद्रपूर), प्रकाश बापूरावजी बोळे आणि रंजना मधुकर कडू या चाैघांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच काहीजण श्वास गुदमरून, तर काही भाजून जखमी झाले. त्या घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाइकांचा रोष उफाळून आला. या पार्श्वभूमीवर, मृत पारधी यांचे जावई प्रवीण रामदास महंत (वय ३७) यांनी सोमवारी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून वाडी पोलिसांनी रात्री वेलट्रीट हॉस्पिटलचे डॉ. राहुल ठवरे तसेच प्रशासनातील मंडळींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे कलम ३०४ भा.दं.वि. ३४ नुसार गुन्हा दाखल केला. लोकमतने हे वृत्त मंगळवारी ठळकपणे प्रकाशित केले. त्यामुळे बळ मिळालेल्या सोनबरसे यांच्या वडिलांनी आणि कडू यांचे भाचे अमित वानखेडे यांनी वाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनीही आपल्या तक्रारी पोलिसांकडे दिल्या. एकाच प्रकरणात वेगवेगळ्या तक्रारी घेऊन वेगवेगळे गुन्हे दाखल करता येत नसल्याचे सांगून वाडी पोलिसांनी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत सोनबरसे आणि वानखेडे यांचे बयाण नोंदवून घेतले. त्यांना बयानाची प्रत देण्याऐवजी महंत यांच्या तक्रारीवरून नोंदविलेल्या एफआयआरची प्रत देण्यात आली.
----
दोन दिवस जेवणच दिले नाही
या प्रकरणात हॉस्पिटल प्रशासनाचा आणखी एक संतापजनक पैलू उघड झाला आहे. रुग्ण दाखल करून घेण्यापूर्वीच ५० हजार आणि नंतर दर दिवशी २० ते ३० हजारांची मागणी करणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णांची मोठी हेळसांड केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी लावला आहे. जागा नसताना दाटीवाटीने बेड लावणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णांना दोन-दोन दिवस जेवणही दिले नसल्याचा तक्रारीत उल्लेख केला आहे. पोलिसांनी या हॉस्पिटलच्या प्रशासनाविरुद्ध गुन्हा तर दाखल केला. मात्र, अटकेची कारवाई कधी करतात, त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
----