आधार केंद्रात चोरी करणारे दोघे पोलिसांच्या तावडीत, ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त
By दयानंद पाईकराव | Published: April 13, 2024 06:52 PM2024-04-13T18:52:19+5:302024-04-13T18:52:50+5:30
गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने तांत्रीक तपास आणि मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून मोहम्मद फैयाज आणि ईरफान शमशादला ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
नागपूर : आधार कार्ड बनविण्याच्या केंद्रात चोरी करून ६५ हजार रुपये चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने ताब्यात घेऊन ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोहम्मद फैयाज ईजाज अंसारी (२२, रा. गंगाबाग, भांडेवाडी, पारडी) आणि ईरफान शमशाद अंसारी (२३, भांडेवाडी, पारडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत टेलिफोन एक्स्चेंज चौक गायत्री टॉवरमध्ये शॉप नं. १०३ येथे विशाल जनसेवा केंद्र आहे. विशाल मारोतराव पारधी (३५, रा. रामसुमेरबाबानगर, शांतीनगर) हे या केंद्रात आधारकार्ड बनवितात. २२ मार्चला रात्री अज्ञात आरोपींनी त्यांच्या दुकानाचे शटर तोडून स्टीलच्या डब्यातील ६५ हजार रुपये चोरून नेले होते. सीसीटीव्ही फुटेज तपासून पारधी यांनी लकडगंज ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार केल्यानंतर आरोपींविरुद्ध कलम ४६१, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने तांत्रीक तपास आणि मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून मोहम्मद फैयाज आणि ईरफान शमशादला ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून एक दुचाकी किंमत ५० हजार, ३ हजार रुपये रोख असा ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.