दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरक्षणाचे तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना अनेकदा तिकीट देणाऱ्या बुकिंग क्लर्कचे बोलणे बाहेर ऐकू येत नाही. काऊंटरच्या बाहेर उभ्या असलेल्या प्रवाशांचा आवाजही संबंधित क्लर्कला ऐकू येत नाही. त्यामुळे रेल्वेने यावर पर्याय शोधून ‘टु वे माईक सिस्टीम’उपलब्ध करून दिली आहे. यामुळे आता प्रवासी तसेच बुकिंग क्लर्कला विनाव्यत्यय एकमेकांचा आवाज ऐकू येणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवण्यातही ही यंत्रणा महत्त्वाची ठरत आहे.आरक्षण कार्यालयात नेहमीच प्रवाशांचा गजबजाट असतो. अनेक प्रवासी रांगेत उभे राहतात. याशिवाय आरक्षण कार्यालयातील पंख्यांचा आवाजही येतो. अशा वातावरणात बुकिंग क्लर्कने तिकीट काढणाºया प्रवाशास काही विचारणा केली असता त्याचे म्हणणे संबंधित प्रवाशास ऐकू येत नाही तर प्रवाशाने सांगितलेली माहितीही बुकिंग क्लर्कला ऐकू येत नसल्यामुळे संबंधित प्रवासी तिकीट खिडकीच्या जवळ जाऊन बुकिंग क्लर्कशी संवाद साधतो. सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरु आहे. त्यामुळे ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवणे गरजेचे आहे. आरक्षण कार्यालयात प्रवासी आणि बुकिंग क्लर्कमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवता यावे यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उपाययोजना केली आहे. विभागातील नागपूर रेल्वेस्थानकावरील ७ आरक्षण खिडक्यांवर ‘टु वे माईक सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. या सिस्टीमच्या माध्यमातून बुकिंग क्लर्कचे म्हणणे मोठ्या आवाजात प्रवाशांना तर प्रवाशांचे बोलणे बुकिंग क्लर्कला ऐकता येणार आहे. त्यामुळे दुरुनच दोघेही एकमेकांशी प्रभावी संवाद साधू शकणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर नागपूर रेल्वेस्थानकावर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यानंतर अजनी आरक्षण कार्यालय आणि विभागातील सर्वच आरक्षण कार्यालयात ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रेल्वेने सुरु केलेली ‘टु वे माईक सिस्टीम’ नक्कीच प्रवाशांसाठी आणि रेल्वेच्या बुकिंग क्लर्कसाठी सुरक्षेची ठरणार आहे.
‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरक्षण कार्यालयात ‘टु वे माईक सिस्टीम’ सुरु करण्यात आली आहे. भविष्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सर्वच आरक्षण कार्यालयात ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.’-एस. जी. राव. जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग