नागपूर : नागपूरहून पारशिवनी येथे फिरायला आलेले दाेघे तरुण शहरालगतच्या तलावात लाकडी नावेत बसून नाैकानयन करू लागले. मध्येच नाव उलटल्याने दाेघेही बुडले. ही घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारी घडली असून, सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांचे मृतदेह शाेधून काढण्यात पाेलिसांना यश आले.
अर्धवट तुटलेल्या लाकडी नावेत बसून तलावात गेलेल्या दोन युवकांचा नाव उलटल्यामुळे बुडून मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी येथील बरेजा पंच कमिटीच्या लहान तलावात गुरुवारी दुपारी उघडकीस आली.
भवानी नेमीचंद जांगीड (वय २४) व पंकज जांगीड (२३), दोघेही रा. महेश काॅलनी, चंदननगर, नागपूर अशी मृतांची नावे आहेत. दाेघेही नातेवाईक असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. ते एमएच-३१/बीएच-५०९७ क्रमांकाच्या माेटारसायकलने गुरुवारी दुपारी पारशिवनी शहरात फिरायला आले हाेते. दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास शहरालगत असलेल्या बरेजा पंच कमिटी तलावाच्या काठी माेटारसायकल, जाेडे व कपडे आढळून आले; तसेच तलावातील नाव दिसत नसल्याने स्थानिक तरुणाने पाेलिसांना माहिती दिली.
महसूल व पाेलिस विभागातील कर्मचाऱ्यांनी त्या दाेघांचा पाण्यात शाेध घेतला असता, सायंकाळी सहाच्या सुमारास दाेघांचेही मृतदेह आढळून आले. दाेघेही दुपारी १२ ते २ वाजताच्या दरम्यान बुडाले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
छोटा गोवा नावाने प्रसिद्ध
या ठिकाणी बरेजा पंच कमिटीच्या मालकीचे लहान व माेठा असे दोन तलाव आहेत. दाेन्ही तलावांतील अंतर ३०० मीटर आहे. हा परिसर निसर्गरम्य असल्याने तो ‘छोटा गोवा’ नावाने प्रसिद्ध आहे. येथे पर्यटकांची वर्दळ असते. विशेष म्हणजे, लहान तलावाजवळ कुणीही जात नाही. या तलावाकडे जाणारी पायवाट शेतातून जाते. दाेघेही या लहान तलावाजवळ कसे व का गेले, हे मात्र स्पष्ट झाले नाही.