नागपुरात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 07:53 PM2020-05-28T19:53:24+5:302020-05-28T21:20:04+5:30

वेगवेगळी थाप मारून सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातील रक्कम लांबवत आहेत. नागपुरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सारखी वाढ होत आहे. गेल्या दोन आठवड्यात अशा प्रकारच्या शहरात पंधरा घटना घडल्या असताना आता आणखी बुधवारी दोन घटना उघडकीस आल्या आहेत.

Types of fraud by cyber criminals continue in Nagpur | नागपुरात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच

नागपुरात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच

Next
ठळक मुद्देवेगवेगळी थाप : रक्कम लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगवेगळी थाप मारून सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातील रक्कम लांबवत आहेत. नागपुरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सारखी वाढ होत आहे. गेल्या दोन आठवड्यात अशा प्रकारच्या शहरात पंधरा घटना घडल्या असताना आता आणखी बुधवारी दोन घटना उघडकीस आल्या आहेत.
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीहरी नगरात राहणारे नंदकिशोर मधुकर मून (वय ६७) यांना १ मे रोजी सायबर गुन्हेगाराचा फोन आला. आपण बँक अधिकारी बोलतो. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. ते नव्याने सुरू करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी मून यांचा एटीएम कार्ड नंबर मागितला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मागून मून यांच्या बँक ऑफ बडोदा खात्यातील ४९ हजार ३९५ रुपये काढून घेतले.
दुसरी अशीच घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ मे रोजी घडली. पेन्शन नगरातील रहिवासी शकील इक्बाल अब्दुल (वय ४२) यांच्या मोबाईलवर एकाने फोन केला. तुमचे केवायसी करायचे आहे, असे सांगून आरोपीने शकील यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना मोबाईलवर एक लिंक पाठविली. ही लिंक ओपन केल्याच्या काही वेळेनंतर शकील यांच्या खात्यातून आरोपीने ४९ हजार ९९८ रुपये काढून घेतले.
या दोन्ही प्रकरणात नमूद पीडित व्यक्तींनी सायबर शाखेत धाव घेतली. त्यांच्या तक्रारी घेतल्यानंतर सायबर शाखेकडून या दोन्ही प्रकरणांचा तपास करण्यात आला. त्यानंतर बुधवारी अनुक्रमे अजनी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तरीही फसवणूक सुरूच
नागपुरातच नव्हे तर विविध शहरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना रोज घडत आहेत. वृत्तपत्रांमधून त्याची माहितीही प्रकाशित होते. तरीसुद्धा काही व्यक्ती शहानिशा न करता आपल्या बँक खात्याबाबत अनोळखी व्यक्तीला माहिती देतात. लॉटरी लागली, एटीएम, क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले, केवायसी करायचे आहे, अशी थाप सायबर गुन्हेगार मारतात. त्यानंतर कार्ड किंवा बँक खात्याची माहिती विचारतात किंवा मोबाईलवर एक लिंक पाठवितात. ही लिंक ओपन करताच आपल्या बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती आरोपीला कळते आणि त्या आधारे तो ऑनलाईन रक्कम काढून घेतो. वारंवार अशा घटना घडत असून बँकेतर्फेही खातेधारकांना नेहमीच सूचना दिल्या जातात. तरीसुद्धा पुरेशी काळजी न घेतल्यामुळे अशा घटना घडण्याची मालिका सुरूच आहे.

सायबर शाखेचे आवाहन
या घटनांपासून धडा घेऊन नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन, स्थानिक सायबर शाखेकडून करण्यात आले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याची, एटीएम अथवा क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये. केवायसी करण्याचा प्रकार शक्यतो बँकेत जाऊनच करावा. सायबर गुन्हेगाराच्या थापेबाजीला बळी न पडता आपली रक्कम त्याने लंपास करू नये यासाठी प्रत्येकाने पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Types of fraud by cyber criminals continue in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.