नागपुरात अनियंत्रित ट्रकने सेवानिवृत्त शिक्षिकेला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 10:30 PM2018-03-28T22:30:39+5:302018-03-28T22:30:49+5:30
कोराडी रोडवरील मानकापूर चौकात एका अनियंत्रित ट्रकने बाईकला धडक देत सेवानिवृत्त शिक्षिकेला चिरडले. यात बाईक चालक भाऊही गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोराडी रोडवरील मानकापूर चौकात एका अनियंत्रित ट्रकने बाईकला धडक देत सेवानिवृत्त शिक्षिकेला चिरडले. यात बाईक चालक भाऊही गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली.
आशा जैन (६०) रा. बिडीपेठ असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. तर दत्तात्रय वºहाडे (४६) असे जखमीचे नाव आहे. या घटनेमुळे मानकापूर चौकात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आशा जैन या शिक्षिका होत्या. त्या दोन वर्षांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या शाळेतून सेवानिवृत्त झाल्या. दत्तात्रय वऱ्हाडे हे आशा यांचे मानलेले भाऊ आहेत. दत्तात्रय यांच्या मुलाचे लग्न आहे. त्यामुळे ते लग्न पत्रिका वाटण्यात व्यस्त आहेत. ते आशा यांना घेऊन लग्न पत्रिका वाटण्यासाठी मानकापूरला गेले होते. परत येत असताना हा अपघात घडला. मानकापूर चौकातून पलटत असताना जरीपटकाच्या दिशेने आलेल्या ट्रक क्रमांक पीबी. /४६/ एम/ ८९०७ च्या चालकांना जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. आशा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दत्तात्रय यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मानकापूर पोलिसांनी ट्रक चालक सुखदेवसिंह जग्गासिंह (४७) रा. भुजिया, पंजाब याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वर्षभरात चौघांचा मृत्यू
सूत्रानुसार आशा यांच्या कुटुंबात एका वर्षात चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. वर्षभरापूर्वी त्यांचा सर्वात मोठा मुलगा आशिष याचा कामठी रोडवरील आॅटोमोटिव्ह चौकात अपघातात मृत्यू झाला. या घटनेच्या काही दिवसानंतरच पतीचाही आजाराने मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी लहान मुलगा स्वप्नील याचाही मृत्यू झाला. कुटुंबात आशा यांच्याशिवाय आशिषची पत्नी किरण, दहा वर्षाचा मुलगा आयुष आणि सात वर्षाची मुलगी वैदेही आहे. आशा एकट्याच राहत होत्या.
रोजच अपघाताची भीती
मानकापूर चौक हा अतिशय धोकादायक असा चौक झाला आहे. येथे दररोज अपघात होत असतात.त्यामुळे येथून जातांना नागरिकांना घाबरतच जावे लागते. याठिकाणी वाहतूक पोलीस तैनात असतात, पण ते वाहतूक सुरळीत करण्याऐवजी पुलाखाली सावलीत उभे राहतात.
मदत सोडून मोबाईल शुटिंग
घटना घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली होती. पण कुणीही मदतीसाठी पुढे येत नव्हता. जो-तो स्वत:चा मोबाईल काढून शुटिंग करण्याचा किंवा फोटो काढण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे जखमींना वैद्यकीय मदत मिळण्यास उशीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.