लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जेट एअरवेजच्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे गुरुवारी सायंकाळी ५.२० वाजता नागपूर-दिल्ली विमानाने रात्री १२ वाजेपर्यंत उड्डाण भरले नव्हते. त्यामुळे प्रवाशांना पहाटे ३ वाजता अमेरिकेला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानाला मुकावे लागले.अमरावती येथील रहिवासी राजेंद्र वानखेडे आणि त्यांची पत्नी छाया वानखेडे यांनी सांगितले की, आम्ही अमेरिकेच्या सॅनफ्रॅन्सिस्को प्रांतातील मुलीच्या भेटीला जाणार होतो. नागपुरातून दिल्लीला पोहोचून पहाटे ३ वाजता सॅनफ्रॅन्सिस्कोचे आंतरराष्ट्रीय विमान होते. पण रात्री १२ पर्यंत विमान दिल्लीला जाण्याची शक्यता मावळल्यानंतर अखेर रात्री १२.१० च्या सुमारास नागपुरात हिंगणा येथे राहणाऱ्या भाच्याकडे टॅक्सीने परतावे लागले. आंतरराष्ट्रीय विमान तिकिटाचा आर्थिक भुर्दंड जेट एअरवेज कंपनीने द्यावा, अशी मागणी त्यांनी लोकमतशी बोलताना दिली. कंपनीने पाच महिलांना इंडिगोच्या विमानाने दिल्लीला नेले. जोडून आंतरराष्ट्रीय विमान असलेल्यांना कंपनीने विचारणा केली नाही. अन्य विमानाने आम्हाला दिल्लीला नेले असते तर अमेरिकेचे विमान मिळाले असते.नागपुरातील रहिवासी अॅड. सुमित पाचखंडे म्हणाले, दिल्लीला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दोन प्रॉपर्टी प्रकरणाच्या सुनावणीसाठी जात आहे. पण रात्रीपर्यंत विमान न उडाल्याने विमातळावर ताटकळत थांबावे लागले. दिल्लीत नाही पोहोचलो तर काय होईल, हे सांगणे कठीण आहे. शिवाय गुरुवारी रात्री १० वाजता दिल्लीत एका परिषदेला उपस्थित राहता आले नाही. त्याची खंत आहे.नवनीत गौर आणि त्यांच्या पत्नी यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी ७ वाजता दिल्लीवरून लेह-लद्दाखसाठी विमान आहे. पाच सहकारी आधीच दिल्लीला वाट पाहात आहेत. पण रात्री १२ पर्यंत विमानाची सोय नसल्यामुळे चिंता आहे. दिल्लीत पोहोचलो तर ठीक, नाहीतर जेट एअरवेजच्या ढिसाळ कारभारामुळे लेह-लद्दाख वारीला मुकावे लागेल. शिवाय हाँगकाँग येथील चार नागरिकांना जोडून असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानाला मुकावे लागले. त्यांनी विमानसेवेवर नाराजी व्यक्त केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर बऱ्या च वेळेपर्यंत प्रवाशांना खाद्यपदार्थ दिले नाही. त्याचा लहानांसह वयस्क नागरिकांना त्रास झाला.
अमेरिका आणि हाँगकाँगचे विमान सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 1:31 AM
जेट एअरवेजच्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे गुरुवारी सायंकाळी ५.२० वाजता नागपूर-दिल्ली विमानाने रात्री १२ वाजेपर्यंत उड्डाण भरले नव्हते. त्यामुळे प्रवाशांना पहाटे ३ वाजता अमेरिकेला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानाला मुकावे लागले.
ठळक मुद्देजेट एअरवेजचा ढिसाळ कारभार : विमानसेवेवर नाराजी