विद्यापीठाचे निर्देश : १७ ऑगस्टपासून ऑनलाईन वर्ग सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:46 AM2020-08-14T00:46:37+5:302020-08-14T00:51:07+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून सर्व संलग्नित महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात यावेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून सर्व संलग्नित महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात यावेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. प्रथम वर्ष वगळता इतर सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग यामुळे पुढील सोमवारपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाने लेखी निर्देश न काढल्याचे कारण समोर करत काही महाविद्यालये व पदव्युत्तर विभागप्रमुखांनी कुठलीही तयारी केली नव्हती. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. लोकमतने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर तातडीने गुरुवारी विद्यापीठाकडून अधिसूचना जारी करण्यात आली.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्टपासून विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू करण्यात येणार असल्याचे परिपत्रक जारी केले. सत्र प्रणालीनुसार महाविद्यालयांना डिसेंबर महिन्यापर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. यूजीसीच्या नियमांनुसार सेमिस्टर सत्रात किमान ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र व्हायला हवे. मात्र ‘कोरोना’मुळे महाविद्यालये व विभागात प्रत्यक्ष वर्ग होणे सध्या तरी शक्य नाही. अशा स्थितीत ‘ऑनलाईन’ वर्गांच्या माध्यमातून अध्यापन अपेक्षित आहे. मात्र विद्यापीठातीलच काही विभागप्रमुखांनी यासंदर्भात पुढाकार घेतलेला नाही. प्रशासनाकडून अद्याप निर्देश न आल्याचे कारण सांगत काही ‘अनुभवी’ विभागप्रमुखांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली होती. यामुळे ‘आॅनलाईन’ वर्ग १७ ऑगस्टपासून सुरू होणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता.
अखेर नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या निर्देशांनंतर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक सत्रासंदर्भात सुधारित शैक्षणिक कॅलेंडर जारी केले होते. संबंधित शुद्धिपत्रक तसेच राज्य शासनाच्या २९ जुलैच्या निर्देशांनुसार सर्व संलग्नित महाविद्यालये, पदव्युत्तर विभागांत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात यावे, असे या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.