चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला १० वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:05 AM2019-05-10T00:05:02+5:302019-05-10T00:06:44+5:30
विशेष सत्र न्यायालयाने चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीतील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीतील आहे.
दिलीप श्रीराम लोहरे (४९) असे आरोपीचे नाव असून, तो न्यू अमरनगर येथील रहिवासी आहे. न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३७७ अंतर्गत १० वर्षे कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार आठवडे अतिरिक्त कारावास तर, पोक्सो कायद्यातील संबंधित कलमांतर्गत पाच वर्षे कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन आठवडे अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली.
ही घटना २४ मे २०१७ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित चिमुकला नऊ वर्षे वयाचा होता. आरोपीने पीडित चिमुकल्याला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घरी नेले व त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला तसेच याची माहिती कुणाला सांगितल्यास ठार मारेन, अशी धमकी दिली. घटना उघड झाल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यावरून आरोपीला २८ मे २०१७ रोजी अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. धर्मेजवार यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारच्यावतीने अॅड. विजया बालपांडे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी साक्षीदारांचे बयान व विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.