नागपूर रेल्वेस्थानकावर बेवारस बॅगने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:00 AM2018-06-12T00:00:48+5:302018-06-12T00:01:37+5:30
नागपूर रेल्वे स्थानकावर आढळलेल्या एका बेवारस बॅगमुळे सोमवारी दुपारी एकच खळबळ उडाली. श्वान पथकाच्या तपासणीनंतर पोलिसांनी या बॅगमध्ये कोणतीच आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर ही बॅग लोहमार्ग पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर आढळलेल्या एका बेवारस बॅगमुळे सोमवारी दुपारी एकच खळबळ उडाली. श्वान पथकाच्या तपासणीनंतर पोलिसांनी या बॅगमध्ये कोणतीच आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर ही बॅग लोहमार्ग पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.
सोमवारी दुपारी ड्राप अॅण्ड गो च्या दुसऱ्या रांगेत एक बेवारस बॅग आढळली. बऱ्याच वेळापासून बॅगजवळ कुणीच आले नसल्यामुळे आजूबाजूच्या प्रवाश्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. प्रत्येकजण त्या बॅगकडे संशयाच्या नजरेने बघत होता. या घटनेची माहिती लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्याचवेळी बॉम्ब शोधक व नाशक पथक नागपूर रेल्वेस्थानकावर तपासणी करीत होते. बॅगबाबत माहिती मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी बघ्यांची चांगलीच गर्दी जमली. श्वान लियोने बॅगची तपासणी केली. मात्र, त्यात कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. पथकातील पोलिसांनी बॅग उघडली असता त्यात कपडे, औषधी आणि कागदपत्रे होती. त्यानंतर ही बॅग लोहमार्ग पोलीस ठाण्यात जमा करुन पंचनामा करण्यात आला. या कारवाईत सहायक उपनिरीक्षक सतीश देशमुख, हेड कॉन्स्टेबल मनोज गुप्ता, सुधाकर मून, विजय सुरवाडे, निरज पाटील, डॉग हॅन्डलर पंकज बोरकर आणि वाहन चालक सोहन विश्वकर्मा यांचा समावेश होता.